Maharashtra Political Crisis : नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:29 PM2022-06-30T15:29:26+5:302022-06-30T15:35:26+5:30
नव्या सरकारमध्ये नाशिकलादेखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता ...
नव्या सरकारमध्ये नाशिकलादेखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भाजपची सत्ता आल्यास नाशिकमधून कोण मंत्री होणार याविषयी उत्सुकता आहे.
नाशिकमध्ये आमदार प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर आणि सीमा हिरे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांचा वारसा म्हणून डॉ. राहुल आहेर यांची दावेदारी यापूर्वीही होती. त्यांच्याबरोबरच आमदार देवयानी फरांदे यांचीदेखील दावेदारी मानली जात आहे.
सन २०१९ मध्ये राज्यात आलेले सरकार हे अनिष्ट युती करून सत्तेवर आले होते. तेच आता नाकारले गेले आहे.
- आमदार डॉ. राहुल आहेर
जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हेच होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. शिवसेनेच्या आमदारांनाही हे सरकार नको होते. गेली अडीच वर्षे निधी देताना दुजाभाव करण्यात आला.
- आमदार सीमा हिरे
अडीच वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेच्या दृष्टीने जनतेने कौल दिला होता. मात्र, राज्यात अनिष्ट युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर होते, आता पुन्हा एकदा जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर येईल.
- आमदार ॲड. राहुल ढिकले