महाराष्ट्र सदन भरतीप्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: May 14, 2015 12:14 AM2015-05-14T00:14:37+5:302015-05-14T00:16:19+5:30
संभ्रमावस्था : उमेदवारांची नावे पात्र-अपात्र अशा दोन्ही याद्यांमध्ये; एमकेसीएलचे तोंडावर बोट
नाशिक-
महाराष्ट्र सदनमध्ये विविध पदांकरिता राबविण्यात येत असलेली भरतीप्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, हजारो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या पात्र, अपात्र उमेदवारांच्या याद्यांमध्ये बराच घोळ असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, एमकेसीएलने यासर्व प्रकाराबाबत तोंडावर बोट ठेवल्याने गुणवंत उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त व सचिव कार्यालयातर्फे स्वागत अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी, संपर्क अधिकारी, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक या पदांकरिता एमकेसीएलमार्फत भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. याबाबतची ४ मार्च २०१५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून २१ मार्च २०१५ पर्यंत अर्ज मागविले होते. त्यानुसार महाराष्ट्रभरातील उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्जही केले. २४ एप्रिल २०१५ रोजी याबाबतची एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र, अपात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली. यामध्ये प्रत्येक पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांचे नावे जाहीर केले. मात्र १२ मे २०१५ रोजी जाहीर केलली दुसरी यादी पहिल्या यादीच्या पूर्णत: विपरीत असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कारण पहिल्या यादीत जे उमेदवार अपात्र ठरविले होते, त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत आहेत, तर पहिल्या यादीत जे उमेदवार पात्र होते, ते दुसऱ्या यादीत अपात्र ठरविले आहेत. त्याचबरोबर पहिल्या यादीत स्वागत अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी, संपर्क अधिकारी व उपलेखापाल या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या जाहीर केल्या होत्या. मात्र दुसऱ्या यादीत केवळ स्वागत अधिकारी या पदाचीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये संपर्क अधिकारी, राजशिष्टाचर अधिकारी, उपलेखापाल या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचीही नावे आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, त्यांना कोणत्या पदासाठी परीक्षा द्यावी लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या पदांच्या परीक्षेसाठी केवळ पुणे, औरंगाबाद, नागपूर या तीनच ठिकाणी परीक्षा केंद्रे दिल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यातच बहुतेक विद्यार्थ्यांना आपण परीक्षेस पात्र कि अपात्र हे कोडे कायम असल्याने परीक्षा द्यावी की नाही याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. मात्र यावर संपर्क साधल्यास समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून केल्या जात आहेत.