Vidhan Sabha 2019 : महाजनांच्या गुगलीने भाजप आमदार धास्तावले; उमेदवारीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:18 AM2019-09-21T04:18:41+5:302019-09-21T04:19:00+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आमदारांना उमेदवारी मिळेल काय हे गंगामय्येलाच माहिती, असे विधान केल्याने आमदारांची धाकधूक वाढली आहे.
नाशिक : नाशिक शहरातील भाजपाच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत तगडी आव्हाने उभी राहत असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आमदारांना उमेदवारी मिळेल काय हे गंगामय्येलाच माहिती, असे विधान केल्याने आमदारांची धाकधूक वाढली आहे. नाशिक शहरात चार पैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे आमदार आहेत. विद्यमान आमदारांना साधारणत: पुन्हा संधी दिली जात असते. मात्र भाजपात अस्थिर वातावरण आहे. पक्षांतर्गत या उमेदवारांना मोठे आव्हान उभे झाले आहेत.
प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या इतकी वाढली आहे की, आमदारांना ते अडचणीचे ठरत आहे. संंबंधित इच्छुकांनी केवळ इच्छाच व्यक्त केली असे नव्हे तर सर्वच जण प्रचाराच्या तयारीलादेखील लागले आहेत. त्यामुळे आमदारांना विरोधकांपेक्षा पक्षातील इच्छुकच अधिक डोईजड झाले आहेत, असे असताना उमेदवारी निवडीत निर्णायक मत असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र केलेल्या विधानामुळे आमदार धास्तावले आहेत. गुरुवारी (दि.१९) गंगेच्या धर्तीवर गंगाआरती सुरू करण्याच्या सोहळ्याच्या वेळी त्यांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार काय? या प्रश्नावर त्यांनी गंगा मय्येलाच माहीत, उमेदवारी मिळणार की नाही हे सांगण्यास मी पुरोहित नाही, असे सांगितल्याने त्याच ठिकाणी असलेले आमदार धास्तावले आहेत.
काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी शहरातील आमदारांसंदर्भातील अशाच प्रकारच्या प्रश्नावर बोलताना जो निष्ठावान असेल, ज्याने पाच वर्षांत कोणता वाद घातला नसेल, खूप कामे केली असतील अशा प्रकारचे निकष बघूनच उमेदवारीचा निर्णय होईल, असे सांगितले होते. शहरातील प्रत्येक आमदाराचेच काही ना कारणावरून पक्षात वाद झाले आहेत.
>शिवसेनेला धक्का : राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात अखेर युती झाली असली तरी नाशिक शहरातील जागांबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेतील इच्छुकांचा भ्रम निरास होण्याची शक्यता आहे. विद्यमान जागा भाजपकडेच राहतील असे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.