Maharashtra Voting: नाशिक जिल्ह्यात मतदानाला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 08:03 AM2019-10-21T08:03:06+5:302019-10-21T08:03:22+5:30
नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात आज सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह ...
नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात आज सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर सकाळी पावणे सात वाजेपासून मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली आहे. बीएलओ उपलब्ध नसेल त्या ठिकाणी नागरिकांनी मतदार यादीत नाव शोधून घेत तसेच मोबाईल अॅपचा वापर करीत नावे शोधून मतदान केले आहे. मतदान यंत्रे बिघाडाच्या किरकोळ तक्रारी असून नाशिक मध्य मतदार संघात द्वारका येथील अटल बिहारी वाजपेयी स्कुलमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळावे लागले. नाशिक शहरासह जिल्ह्यात सर्वच मतदार संघात भल्या सकाळी उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक जिल्ह्यात एकुण १५ विधानसभा मतदार संघ असून त्यात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकुण ४५ लाख २४ हजार मतदार असून त्यात २३ लाख ७६ हजार ४०५ पुरूष मतदार आहेत. तर २१ लाख ६८ हजार ३०९ महिला मतदार आहेत. दिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी साडे चारशे व्हील चेअरची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण
४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. त्यातील २५६ मतदान संवेदनशील आहेत. तर ४५८ मतदान केंद्रांवरून थेट वेबकास्टींगच्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पाण्यापासून प्रथमोपचारापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात मतदान शांतते पार पडावे यासाठी पोलीसांनी विशेष दक्षता घेतली आहे. मालेगाव आणि निफाड येथे ड्रोनच्या माध्यमातून दाट वस्तीच्या मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी सशस्त्र पोलीस दलाच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात ४५० गुन्हेगार तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले आहेत.