महाराष्टÑ पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:27 AM2018-05-03T01:27:42+5:302018-05-03T01:27:42+5:30
कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.
कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामावर महाराष्ट्रदिनी महाश्रमदान करण्यासाठी आलेल्या श्रमिकांच्या व जलमित्रांच्या भेटीला राव आल्या असता त्यांनी जलमित्रांचे काम बघून कौतुक करत विश्वास व्यक्त केला. पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान किरण राव यांचे सत्यजित भटकळ यांच्या बरोबर कोनांबेच्या माळरानावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अभिनेत्री अनिता दाते, मिस इंडिया शिल्पी अवस्ती उपस्थित होत्या. यावेळी कोनांबे येथील महिला व विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. विविध भागातून आलेल्या श्रमजीवींचेही ग्रामस्थांनी तिलक लाऊन स्वागत केले. यावेळी नावनोंदणीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. उपस्थित सेलिब्रिटींनी श्रमदान करत सहभागी श्रमजीवी तसेच जलमित्रांबरोबर फोटो काढत उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी पानी फाउण्डेशनचे भटकळ, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी निकम, सरपंच संजय डावरे आदींनी पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. कोनांबेवासीयांनी केलेल्या व्यवस्थेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
तीव्र उन्हाच्या झळा सोसत श्रमजीवी व जलमित्रांबरोबर उपस्थिती सेलिब्रिटींनीही सुमारे तीन तास श्रमदान केले. आज झालेल्या श्रमदानातून कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची भूजल पातळीत साठवण होईल एवढे काम झाल्याचे फाउण्डेशनचे सदस्य व जलमित्र बापू डावरे व साहेबराव डावरे यांनी सांगितले.दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण भागातील लोकांच्या बरोबरीने शहरातील लोकांचा श्रमदानासाठी वाढता ओघ बघून खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेने ही चळवळ पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सत्यमेव जयते’च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती व जनतेच्या विविध समस्या जवळून बघता आल्या. नैसर्गिक पाण्याबरोबर जनतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्याची संधी माझ्या हाताला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते अशी कृतज्ञता राव यांनी जनतेशी संवाद साधतांना व्यक्त केली.