लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:59 PM2020-04-26T17:59:20+5:302020-04-26T17:59:20+5:30

महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयीचा लेख...

 Mahatma Basaveshwar implementing public welfare schemes | लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

Next

महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शु. अक्षयतृतीया सन ११०५ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी, जि. विजापूर येथे झाला. श्रावण शुद्ध ५ (नागपंचमी) सन ११६७ मध्ये कूडल संगम, जिल्हा विजापूर येथे कृष्णा-मलप्रभा नद्यांच्या संगमात त्यांनी संजीवन जलसमाधी घेतली. (जन्मतारीख, वर्ष, जलसमाधी काल याबाबत मतभेद आहेत.)
बसवेश्वरांनी शेती, वाणिज्य, सामूहिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, छोट्या उद्योगधंद्यात वाढ इत्यादी अनेक योजना आखल्या व त्या राबविल्या. शेतामध्ये विहिरी, तलाव, तळी-बंधारे यांच्या सोयी केल्या. सामूहिक श्रम आणि शिक्षणाची लोकांमध्ये आवड निर्माण केली. सामान्य आणि दलित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी (बाराव्या शतकात) गरिबी हटावसारख्या योजना आखल्या व यशस्वीरीत्या पार पाडल्या.
महात्मा बसेश्वर मनाने, विचाराने आणि कृतीने संत (शिवशरण) होते. ध्यान, चिंतन आणि मनन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या दृष्टीने धर्मशील पुरुष राज्यकर्ता असावा. धर्म म्हणजे ईश्वरी गुण, धर्मशील म्हणजे ईश्वरी गुण धारण करणारा ईश्वर हा विश्वाचा शासनकर्ता आहे. राजा हा राष्ट्राचा शासनकर्ता असतो. राजा किंवा राज्यकर्ता ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून विश्वाच्या त्या भागावर राज्य करीत असतो. म्हणून जे जे ईश्वराचे गुण ते ते गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे लागतात. बसेश्वरांच्या दृष्टीने राजसत्ता हे साधन आहे आणि राष्ट्राचे अंतिम हित हे साध्य आहे. राष्ट्र म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची सगुण-साकार मूर्ती होय. आपल्या उन्नतीसाठी व्यक्तींनी, समाजांनी आणि राज्यकर्त्यांनी त्यांची पूजा करायला हवी. उन्नतीसाठी झटावयास हवे, असे त्यांना वाटे.
महात्मा बसवेश्वर हे अवतारी पुरुष होते. उपजतच त्यांच्या ठिकाणी ईश्वरी गुण होते. त्यांचे हृदय शिवशरणांचे, संतांचे होते. ते धर्मशील होते. प्रापंचिक असूनही विरक्त होते. ते विज्जळ राजाचे प्रधानमंत्री होते. आदर्श शासनकर्ते होते. बालपणापासून अनेक आदर्शांची स्वप्ने ते उराशी बाळगून होते. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. त्या वयापर्यंत त्यांना सगुण साकार ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला होता. राज्यकारभार स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनसूत्र होते.
-अनिल लक्ष्मण कोठुळे
-उत्तर महाराष्ट्र प्रमुख :
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना

Web Title:  Mahatma Basaveshwar implementing public welfare schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.