दिंडोरी लाेकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला धक्का
By संजय पाठक | Published: April 26, 2024 05:13 PM2024-04-26T17:13:18+5:302024-04-26T17:14:29+5:30
माकपचे जे. पी. गावीत यांचा अर्ज दाखल.
Dindori Lok Sabh ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून अर्ज दाखल करीत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषीत केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा घटक असूनही माकपाला याबाबत विचारणा करण्यात आली नाही, त्यामुळे भगरे यांची उमेदवारी मागे घ्यावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला तयार राहावे असा इशारा माकपा नेत्यांनी यापूर्वी दिला होता.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मध्यंतरी ओझर येथे माकप नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, माकप भूमिकेवर ठाम असून शरद पवार यांच्याकडे हा विषय नेण्याचे ठरले आहे. शरद पवार हे माकपाच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असतानाच आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावीत तसेच सुभाष रामू चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.