नाशिकमध्ये अखेर महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:23 PM2023-01-18T22:23:46+5:302023-01-18T22:27:28+5:30
याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा होणार
दीपक भातुसे
मुंबई :विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने अखेर बुधवारी घेतला. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा मिळेल ही शक्यता आता मावळली आहे.
शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात बुधवारी मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत तर काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आता गुरुवारी शिवसेना आणि काँग्रेसचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. अपक्ष अर्ज भरलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेने यापूर्वीच पाठिंबा जाहिर केला होता. तर ही जागा काँग्रेसची असल्याने काँग्रेसने निर्णय घ्यावा अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. मात्र काँग्रेसचाच यासंदर्भातील निर्णय होत नव्हता. अखेर शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आता या मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.