विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:42 AM2019-09-10T00:42:03+5:302019-09-10T00:42:22+5:30
उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
नाशिक : उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवात विद्युत सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत ‘महावितरण गणपतीच्या दारी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.
महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृत तात्पुरती वीजजोडणी देण्यात येते. या सर्व गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतल्याची खात्री करणे, न घेतल्यास आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती आदी उद्देशाने विभागात सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.
वीज गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहायक अभियंता या पथकांचे नेतृत्व करीत आहेत. आतापर्यंत या उपक्रमात नाशिकरोड, जेलरोड, देवळाली, भगूर, आडगाव, द्वारका आणि उपनगर परिसरातील ८१ गणेश मंडळांना भेटी देऊन वीजजोडणी, वायरिंग आदींची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून सूचना देण्यात आल्या.
सातपूरला राबविली मोहीम
नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनीसुद्धा शहरातील सातपूर, अशोकनगर व आनंदवली येथील गणपती मंडळांना भेटी देऊन यासंदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या गणेश मंडळांच्या दर्शनी भागात ऊर्जा संवर्धन व सुरक्षेबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले. गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांकडूनही महावितरणला सहकार्य लाभत आहे.