सिडको परिसरातील ग्राहकांना महावितरणचा ठेंगा
By admin | Published: June 23, 2017 12:10 AM2017-06-23T00:10:25+5:302017-06-23T00:11:22+5:30
सिडको भागातील बहुतांशी ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत कार्यालयातच ठिय्या मांडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : महावितरण कंपनीच्या वतीने गेल्या मे महिन्यात ग्राहकांना दिलेल्या वीज बिलात मागील बिलापेक्षा मोठ्या प्रमाणात रक्कम आकारण्यात आली असल्याने सिडको भागातील बहुतांशी ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत कार्यालयातच ठिय्या मांडला होता. यावर ग्राहकांचे वीज मीटर तपासून घेऊन त्यात काही चूक असल्यास बिल कमी करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु अधिकाऱ्यांनी काही ग्राहकांचे मीटर तपासून ते योग्य असल्याचे सांगत महावितरणने ग्राहकांना ठेंगा दाखविल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने सिडको भागातील घरगुती वापर करणाऱ्या बहुतांशी ग्राहकांचे वीज मीटरचे वाचन न करताच भरमसाठ वीज बिल अदा केले तसेच अचानक वीज अधिभारही लावण्यात आला. यांबरोबरच काही भागांत तर चक्क सरासरी बिल आकारण्यात आल्याने ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसला असून, भरमसाठ बिल आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी नगरसेवक किरण गामणे यांना बरोबर घेत थेट महावितरणच्या सिडकोतील सिम्बॉयसिसशेजारील मुख्य कार्यालयात अभियंत्यांनाच घेराव घालून ठिय्या मांडला होता. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दरमहा देण्यात येणारे वीज बिल हे वेळेवर दिले जात नसल्याचे याआधीदेखील अनेकदा उघडकीस आले आहे.
सिडकोेतील मोरवाडी, तुळजाभवानी चौक, साईबाबानगर, उत्तमनगर, विजयनगर यांसह संपूर्ण सिडको भागातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिल अदा केल्याचे दिसून येत आहे. याआधी कधीही एवढे बिल आलेले नाही जेवढे बिल या महिन्यात प्राप्त झाल्याने ग्राहकांनी महावितरणच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्राहकांना जादा बिल आले आहे अशा तक्रारदारांपैकी काही ग्राहकांचे वीज मीटर तपासून सदरचे मीटर हे योग्य असल्याचे सांगत, आलेले वीज बिल ग्राहकांनी भरावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.