सिडको भागात महावितरणचा प्रताप
By Admin | Published: June 19, 2017 07:09 PM2017-06-19T19:09:45+5:302017-06-19T19:09:45+5:30
भरमसाठ बिल अदा; संतप्त ग्राहकांचा अधिकाऱ्यांना घेराव
सिडको : वेळेत वीज मीटरचे वाचन न करणे, अचानक वीज अधिभार लावणे यांबरोबरच काही भागात तर चक्क सरासरी बिल देणे या कारणांमुळे सिडको भागातील बहुतांश ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसला असून, भरमसाठ बिल आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणचा ताप परंतु ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड बसत असल्याने याबाबत आज ग्राहकांनी थेट महावितरणच्या सिडकोतील सिम्बॉयसिस शेजारील मुख्य कार्यालयात अभियंत्यांनाच घेराव घालून ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दरमहा देण्यात येणारे वीज बिल हे वेळेवर दिले जात नसल्याचे याआधीदेखील अनेकदा उघडकीस आले आहे. महावितरणने यंदा सिडकोेतील मोरवाडी, तुळजाभवानी चौक, साईबाबानगर, उत्तमनगर, विजयनगर यांसह संपूर्ण सिडको भागातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिल अदा केल्याचे दिसून येत आहे. याआधी कधीही एवढे बिल आलेले नाही जेवढे बिल या महिन्यात प्राप्त झाल्याने ग्राहकांनी महावितरणच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकांनी आज महावितरण कंपनीच्या सिडको भागातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळील कार्यालयात नगरसेवक किरण गामणे यांना बरोबर घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जादा बिल आल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात घेराव घालत थेट टेबलावर ठिय्या मांडला. याप्रसंगी दिलीप भास्कर, सुभाष लांडगे, यमुनाबाई सानप, रशिदा शेख यांसह शेकडो ग्राहकांनी जादा बिल आल्याने त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. ज्या ग्राहकांना याआधी हजार रुपये बिल येत होते त्यांना थेट २१ हजारपर्यंत, तर चारशे ते पाचशे रुपये बिल येत असलेल्या ग्राहकांना पंधराशे ते दोन हजार रुपये इतके बिल आले आहे.