येवला वनविभागाने घडविली मायलेकरांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:16 AM2018-03-28T00:16:35+5:302018-03-28T00:16:35+5:30
आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवनप्रवास आहे. आईचे वात्सल्य तिच्या लेकरांचे जीवन असे व्यापून टाकते की, त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते.
निफाड : आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवनप्रवास आहे. आईचे वात्सल्य तिच्या लेकरांचे जीवन असे व्यापून टाकते की, त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. ताटातूट झालेल्या लेकरांचा शोध घेऊन आई जेव्हा कवेत घेते, तेव्हा झालेली ही भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे. अशीच मायलेकरांची भेट घडवून आणण्याचा निफाड तालुक्यातील तिसरा प्रयोग यशस्वी झाला आहे. येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील नागापूर येथे शरद नाठे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कामगारांना २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. नाठे यांनी येवला वनविभागाला कळविल्यानंतर पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बछडे ताब्यात घेतले. यातील दोन बछडे नर, तर दोन बछडे मादी आहेत. हे बछडे १५ दिवसांचे होते. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक डॉ. सिवाबाला यांच्या मार्गदर्शनाखाली येवल्याचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड, वनरक्षक विजय टेकनर. वनरक्षक भरत पाटील, भय्या शेख आदींच्या पथकाने नाठे यांच्या शेतात जुन्नर पॅटर्न वापरून बछडे आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी बछडे सापडले, त्याच रात्री हे बछडे एका प्लॅस्टिकच्या के्रटमध्ये ठेवून त्यावर दुसरा के्रट ठेवण्यात आला. शेजारी शेतात मादीला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी बछडे ठेवलेल्या क्रेटजवळ आली. तीन बछड्यांना तोंडात धरून एकेक करून ती घेऊन गेली; मात्र चौथे बछडे तिथेच राहिले. त्यामुळे वनविभागाने पुन्हा रविवारी (दि. २५) हा प्रयोग राबवला. सोमवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास हे चौथे बछडेही मादी घेऊन गेली.
मादी हिंसक होऊ नये म्हणून...
मादी आणि तिच्या बछड्यांच्या भेटीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग करीत आहे. सापडलेले बछडे के्रटमध्ये ठेवून ते बिबट्या मादीच्या स्वाधीन केले जात आहे जेणेकरून बछड्याच्या ताटातुटीने बिबट्या मादी हिंसक होऊन नागरिकांवर हल्ले करणार नाही हा उद्देश आहे. जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात तिसऱ्यांदा यशस्वी झाला. यावर्षी येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे, शिवरे येथे अशाच पद्धतीने बछडे आईच्या ताब्यात दिले. नागापूर येथे यशस्वी झालेल्या हा तिसरा प्रयोग आहे. येवला वनविभागाने मायलेकरांची भेट घडवून आणल्याने या प्रयोगाचे निफाडकरांनी कौतुक केले आहे.