भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यनिर्मिती आवश्यक महेश झगडे : विभागीय आयुक्त कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:00 AM2018-02-28T02:00:20+5:302018-02-28T02:00:20+5:30
नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात झगडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी किशोर पाठक, अपर आयुक्त जोतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रवीण पुरी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसीलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी झगडे म्हणाले की, मराठी भाषेत लवचिकता आहे. काळानुसार मराठी भाषेच्या स्वरूपात आणि उपयोगात बदल झाले. भाषेत होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेली मराठी भाषेची वैभवशाली परंपरा लक्षात घेता तिच्या विकासाबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही. इतर भाषिकांमध्ये मराठी साहित्य पोहोचविण्याची गरज असल्याचे झगडे यांनी सांगितले. यावेळी कवी किशोर पाठक म्हणाले, कुसुमाग्रजांच्या कवितेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय आहे. त्यांनी प्रेमाची कविता लिहिताना जगण्याची शिकवण दिली आणि माणुसकीचा धागा सोडला नाही. इंग्रजी भाषा जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी असणारी खिडकी असली तरी जीवनाचे ज्ञान मिळवण्याचे मराठी भाषा हे मुख्य दार आहे, असे पाठक यांनी सांगत कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार तहसीलदार एस.डी. मोहिते यांनी मानले.