महिलाराजला मिळणार संधी; तालुक्याचे लक्ष

By admin | Published: January 5, 2017 11:25 PM2017-01-05T23:25:57+5:302017-01-05T23:26:12+5:30

रस्सीखेच : बदललेल्या आरक्षणामुळे अनेकांची निराशा

Mahila Raja will get opportunity; Taluka's attention | महिलाराजला मिळणार संधी; तालुक्याचे लक्ष

महिलाराजला मिळणार संधी; तालुक्याचे लक्ष

Next

 लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाडीवऱ्हे गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तालुक्यासह जिल्ह्यातही प्रभावी ठरण्याची शक्यता लक्षात घेता राजकीय पक्षांनी या गटाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या वाडीवऱ्हे गटासाठी अनुसूचित महिला आरक्षण पडल्यापासून अनेक मातब्बरांचा हिरमोड झाल्याचे बोलले जात असले, तरी आरक्षित जागेसाठी या गटात अनेक मातब्बर असल्याने उलट या गटातील राजकीय रंग वाढीस लागला असून, आजी-माजी आमदार, पंचायत समितीचे आजी-माजी सभापती यांच्या सहभागाने या गटात चांगलेच राजकीय रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. गतवेळी ओबीसी पुरुष आरक्षित या गटावर कै. गोपाळराव गुळवे यांचे सुपुत्र अ‍ॅड. संदीप गुळवे यांची वर्णी होती, तर वाडीवऱ्हे गणावर गोपाळा लहांगे व नांदगाव बुद्रुक गणावर वैशाली सहाने यांची. एकंदरीतच कॉँग्रेसने या गटावर आपली सत्ता कायम केली होती. कॉँग्रेसच्या वाडीवऱ्हे येथे झालेल्या गटनिहाय बैठकीत काँग्रेसकडून आमदार निर्मला गावित यांच्याच घरातील उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावर आमदार गावित यांनी मात्र कोणतेही भाष्य न करता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कै. गोपाळराव गुळवे यांचा बालेकिल्ला असलेल्या या गटात गुळवे समर्थकांचे वर्चस्व कायम राहिले आहे. त्या आधीच्या म्हणजेच २००७ च्या निवडणुकीत गटावर व नांदगाव बुद्रुक गणावर सेनेचीच सत्ता होती. वाडीवऱ्हे गणावर मात्र गत तीन पंचवार्षिकपासून काँग्रेसचीच सत्ता कायम राहिली. मात्र आताच्या राजकीय उलथापालथीने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व विद्यमान सभापती गोपाळ लहांगे हे २००७ चे जिल्हा परिषदेचे प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच पक्षात आल्याने त्यांनी सोयीने गट वाटून घेतल्याचे बोलले जात होते. मात्र सध्याच्या दिसणाऱ्या राजकीय वर्तुळात वेगळेच चित्र पाहावयास मिळत असून, वाडीवऱ्हे गटात शिवसेनेचा नेमका उमेदवार कोण, हा प्रश्न शिवसैनिकांनाही पडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस किंबहुना गोपाळराव गुळवेंनाच आपला पक्ष मानणारा हा गट राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिला आहे.
यापूर्वी सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सातत्याने राखीव असणारा वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट बदललेल्या फेरआरक्षणामुळे गत दहा वर्षांत दुसऱ्यांदा अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. पर्यायाने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्यासह अनेकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे या गटात आपले नशीब आजमवण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. या मतदारसंघात वाडीवऱ्हे व नांदगाव बुद्रुक हे पंचायत समितीचे गण आहेत. नवीन आरक्षणात वाडीवऱ्हे गण इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी, तर नांदगाव बु. गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. या गटात आता सर्वच राजकीय पक्षांचा वावर असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी रणधुमाळी उडणार आहे. गटात विरोधी समर्थकांनी अनेक मार्गांनी डावपेच आखले आहेत. गटातील मूलभूत गरजा, प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान, काही कामे प्रलंबित राहिली असली तरी अपेक्षा पूर्ण करू शकलो, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Mahila Raja will get opportunity; Taluka's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.