सोनजला पुन्हा येणार महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:12+5:302021-01-24T04:07:12+5:30
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत व नोकरदार सुशिक्षितांचे गाव असा नावलौकिक असलेल्या सोनज ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित ग्रामविकास पॅनलचा झेंडा ...
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत व नोकरदार सुशिक्षितांचे गाव असा नावलौकिक असलेल्या सोनज ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित ग्रामविकास पॅनलचा झेंडा फडकला आहे. कृषिमंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्या समर्थक या पॅनलने ११ पैकी नऊ जागांवर विजय मिळविला आहे. पॅनलच्या नेत्यांची सरपंचपदाचे नाव निश्चित करताना कसोटी लागणार आहे. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील सोनज विकास आघाडीला अवघ्या दोन जागा मिळाल्या. सोनज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात पाच वर्षे महिला व मागील दहा वर्षे सर्वसाधारण पुरुष यांनी सांभाळली. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपंचपद सर्वसाधारण महिला होण्याची शक्यता आहे. दहा वर्षांनंतर या खुर्चीवर पुन्हा महिला राज येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच संग्राम बच्छाव, साहेबराव बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली होती. चुरशीच्या झालेल्या दुरंगी लढतीत ग्रामविकास पॅनलने बाजी मारली. एकंदरीत पक्षीय चढाओढीपेक्षा भाऊबंदकी, स्थानिक प्रश्न, गाव पातळीवरील मतभेद याच्या सभोवताली ही निवडणूक रंगली होती. सत्तेच्या रस्सीखेचमध्ये ग्रामविकासने बाजी मारली, तरी आगामी काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आव्हान करभाऱ्यांपुढे आहे. १० वर्षे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषांकडे राहिल्याने, यावेळी आरक्षण सर्वसाधारण महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.