महिंद्रा, बॉशची चाके फिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:25 PM2020-05-12T22:25:20+5:302020-05-12T23:28:09+5:30

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.

Mahindra, Bosch's wheels turned | महिंद्रा, बॉशची चाके फिरली

महिंद्रा, बॉशची चाके फिरली

Next

सातपूर : जिल्ह्यातील मदर इंडस्ट्रीज समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश कंपनीची चाके प्रत्यक्ष फिरायला लागल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे एक हजार लघुउद्योग (सप्लायर्स) व तेथे काम करणा-या हजारो कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने वाहन उद्योगाला काही प्रमाणात गती मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दि. १७ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेल्या कंटेनमेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या अटीवर उद्योगांना उद्योग सुरू करण्यास रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. नाशिक जिल्हा आॅटोमोबाइल (वाहन उद्योग) आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजारच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.
जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही आणि मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्याशिवाय त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योग सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीने दि. २९ पासून कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सोमवारपासून सुरू झाले आहे. तर बॉश कंपनीदेखील दि. ५ मे पासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात लवकरच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही कारखान्यांत साधारणपणे २५ ते ३० टक्के कामगार कामावर बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
------
१५ हजार हातांना काम मिळणार
महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आणि बॉश हे दोन मोठे उद्योग प्रकल्प सुरू झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेले लघुउद्योगदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारखान्यांचे जवळपास एक हजार वेंडर्स असून, सुमारे दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात. लवकरच हे उद्योग सुरू झाल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानंतर खºया अर्थाने वाहन उद्योगाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Mahindra, Bosch's wheels turned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक