महिंद्रा अँन्ड महिंद्रातील कंत्राटी कामगारांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:00+5:302021-06-20T04:11:00+5:30
इगतपुरी : गेल्या पंधरा दिवसापासून महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कामगार विविध मागण्यांसाठी संपावर गेले ...
इगतपुरी : गेल्या पंधरा दिवसापासून महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कामगार विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. दरम्यान, मनसेच्या मध्यस्थीनंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेतला.
कामगारांच्या संपप्रकरणी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आदींनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश न आल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे याबाबत व्यथा मांडल्या. राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कामगारांना दिल्यानंतर गुरुवारी ( दि. १७) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे मुंबई येथील सरचिटणीस सचिन गोळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुका अध्यक्ष मुलचंद भगत, रेल्वे कामगार सेना अध्यक्ष शत्रू भागडे, उपतालुका अध्यक्ष भोलानाथ चव्हाण, उपतालुका अध्यक्ष जनार्दन गतिर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश उगले, मनविसे प्रताप जाखेरे, इगतपुरी शहर अध्यक्ष सुमित बोधक, उपशहर अध्यक्ष राज जावरे, विद्यार्थी सेनेचे विलास भगत यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चार तास यशस्वी चर्चा केली. त्यात व्यवस्थापनाने कामगारांच्या विविध मागण्या मान्य केल्या. अखेर १५ दिवस पुकारण्यात आलेला संप कामगारांनी मागे घेतला. यावेळी कामगारांनी मनसे कामगार सेनेच्या युनियनची महिंद्रा कंपनीच्या गेटवर स्थापना करून युनियनचे फलक लावले.