वडांगळीची मुख्य बाजारपेठ पडू लागली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:14+5:302021-08-24T04:18:14+5:30
वडांगळीच्या गणेश मंदिरापासून ते शनि चौक परिसरात कापड, सोने, किराणा व कृषी साहित्याची दुकाने आहेत. बसस्थानक परिसरातून ओझर-शिर्डी राज्यमार्ग ...
वडांगळीच्या गणेश मंदिरापासून ते शनि चौक परिसरात कापड, सोने, किराणा व कृषी साहित्याची दुकाने आहेत. बसस्थानक परिसरातून ओझर-शिर्डी राज्यमार्ग गेल्याने गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हा परिसर जलदगतीने विकसित होत आहे. त्यामुळे या परिसरात अनेकांनी दुकाने थाटली आहेत. वडांगळीला चारही बाजूंनी जोडणारे रस्ते येऊन मिळत असल्याने ग्राहकही बसस्थानक परिसरातील दुकानांमध्येच खरेदी करण्याकडे वळतात. पूर्व भागातील ग्राहकही खडांगळीहून वडांगळी गावात न येता निमगाव - देवपूर या रस्त्याने ओझर-शिर्डी राज्यमार्गाला जोडले जाऊन थेट बसस्थानक परिसरात खरेदीसाठी जातात. मुख्य पेठेतील ग्राहक कमी झाल्याने अनेक व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही झळ बसली आहे.
चौकट-
रस्ता दुरुस्तीसाठी साकडे
खडांगळी चौफुली ते बाजारतळ मार्गे बसस्थानकाकडे जाणारा रस्ता गेल्या आठ वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. २०१४ नंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वडांगळी येथील गणेश कडवे, विजय कुलथे व खडांगळी येथील सतीश कोकाटे, सागर कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सचिन कुलथे, मंगेश जंगम आदींसह नागरिकांनी निवेदनाद्वारे आमदार कोकाटे यांना साकडे घातले आहे. रस्त्यामुळे अर्ध्या गावातील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना आधार देण्याची गरज असून, समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करणार असल्याचे सुदेश खुळे यांनी सांगितले.