बांधकाम साहित्य टाकून मुख्य रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:31 PM2021-03-16T22:31:09+5:302021-03-17T00:46:44+5:30
नांदगाव : शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून जमीनमालकाने रस्ताच बंद करून टाकल्याने गुरुकृपा नगर भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार माणिकचंद कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस विजय चोपडा व अन्य नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत तक्रारीत म्हटले आहे, सर्वे नंबर ४८/अ व ४९/७ लगतचा व जे.टी. के. इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेपासून गुरुकृपा कॉलनी कडे जाणारा, नगर परिषद नांदगाव यांनी तयार केलेला रस्ता सर्वे नंबर ४९/७ या जमिनीच्या मालकांनी भर रस्त्यात दगड व वीटांचे ४ ट्रॅक्टर व बाभळीचे काटयांच्या फांद्या टाकून बंद केला आहे. हा रस्ता नांदगाव शहराशी जोडणारा मुख्य रस्ता असून तो अचानक बंद झाल्याने गुरुकृपा कॉलनी, नरेंद्र नगर मधील राहणाऱ्या रहिवाशांची गैरसोय झाली आहे. तसेच जेटीके इंग्लिश मिडियम स्कूल, सौ. कमलाबाई मणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची व पालकांची अडचण निर्माण झाली आहे. रहदारीचा रस्ता असल्याने नोकरदार वर्ग, विद्यार्थी, प्रवासी यांची वर्दळ या रस्त्यावर नेहमीच असते. मात्र हा रस्ता बंद केल्याने सर्वांनाच गावामध्ये जाण्या - येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी बाजूने फिरून जातांना अंधार असतो त्यामुळे विद्यार्थिनी, महिला व जेष्ठ नागरिक यांचेसाठी धोकादायक स्थिति निर्माण झाली आहे.सदर रस्ता नगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये आहे. सदर रस्ता खुला करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.