नाशिकची विमानसेवा कायम ठेवा, राजाभाऊ वाजेंचे नागरी उड्डयन विभागाला साकडे
By संकेत शुक्ला | Published: July 5, 2024 02:36 PM2024-07-05T14:36:32+5:302024-07-05T14:36:46+5:30
नाशिक शहरामध्ये क्षमता असताना, विमान कंपन्यांची येथून सेवा सुरू ठेवण्याची इच्छा असतानादेखील या विमानसेवा इतरत्र वळविल्या जात असल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करीत आहेत.
नाशिक : नाशिकच्या विमानसेवेची पळवापळवी सुरू असताना यातून मार्ग काढण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेत नागरी उड्डयन विभागाकडे संपर्क साधत नाशिकच्या विमानसेवा कायम ठेवण्याची मागणी केली आहे. राज्यातील इतर विमानतळांवर नवीन सेवा सुरू करताना नाशिकच्या विमानसेवांमध्ये कपात करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी ही माहिती दिली. नाशिक विमानतळावरून इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून अहमदाबादसाठी दोन विमान सेवा सुरू होत्या. तसेच नाशिक-नागपूर व नाशिक-गोवा ही विमान सेवा देखील इंडिगो कंपनीच्या माध्यमातून सुरू होती. मात्र, नाशिकच्या विमानसेवेतून अहमदाबादसाठी एक सेवा बंद करण्यात आली, तर दुसरी सेवा औरंगाबादकडून वळविण्यात आली आहे. नाशिक-नागपूर व नाशिक-गोवा या दोन विमान सेवा नाशिकहून आठवड्यातून तीन दिवस करण्यात आल्या असून, इतर दिवस त्या औरंगाबाद विमानतळाहून उड्डाण घेणार आहेत.
नाशिक शहरामध्ये क्षमता असताना, विमान कंपन्यांची येथून सेवा सुरू ठेवण्याची इच्छा असतानादेखील या विमानसेवा इतरत्र वळविल्या जात असल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करीत आहेत. या गोष्टीचा पाठपुरावा करीत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यानच राजाभाऊ वाजे यांनी नागरी उड्डयन विभागाच्या मुख्यालयात जाऊन याबाबत माहिती मागितली. इतर शहरांना विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणाचीच हरकत नसली तरी नाशिकहून सुरू असलेल्या विमान सेवा मात्र इतरत्र वळवू नयेत, अशी आग्रही मागणी त्यांनी नागरी उड्डयन विभागाचे मोहोळ यांच्याकडे केली.