जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:27 AM2019-07-12T01:27:28+5:302019-07-12T01:28:37+5:30
पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक : पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या ४२ टक्के पेरण्या झाल्या असून, यापुढे मक्याचे पीक घेणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात प्रामुख्याने अळ्यांकडून मक्याची पाने खरबडून खाण्यास सुरुवात झाली असून, कणसांमध्ये शिरून दाण्यांवर प्रभाव टाकू लागल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांना लष्करी अळीमुळे क्षेत्रावर दुसरे पीक घ्यावे किंवा नाही याची काळजी वाटू लागली आहे. मालेगाव, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते; परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात या तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे मक्याची पेरणी पाहिजे तितकी होऊ शकली नाही. पाऊस अजून लांबला तर यापुढे मक्याचे पीक घेणे शेतकºयांना व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी बाजरी, ज्वारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मक्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता
जाणकारांच्या मते यापुढे शेतकरी मक्याची फारशी पेरणी करू शकणार नाही. मक्याचे पीक तीन ते साडेतीन महिन्यांत येते, त्यानंतर शेतकरी आॅक्टोबरमध्ये लेट खरीप कांद्याची पेरणी करायला मोकळे होतात किंबहुना त्यांना शेत मोकळे मिळते. अशा परिस्थितीत आता उशिराने मका पेरून लेट खरीप कांद्याचे नुकसान करून घेण्यास कोणताही शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे यंदा मकाऐवजी बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, बाजरीची पेरणी आॅगस्ट महिन्यापर्यंत केली तरी चालते त्यामुळे आत्तापर्यंत फक्त ५० हजार हेक्टरवरच बाजरीची पेरणी होऊ शकली आहे.