यंदा ३२ हजार हेक्टरवर मका लागवड अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:27+5:302021-06-09T04:16:27+5:30
गेली काही वर्षे मका पिकाकडे शेतकरी वर्गाचा कल वाढत असून, गेल्यावर्षी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २७ हजार हेक्टर असताना, ...
गेली काही वर्षे मका पिकाकडे शेतकरी वर्गाचा कल वाढत असून, गेल्यावर्षी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २७ हजार हेक्टर असताना, यंदा ३० ते ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड अपेक्षित आहे. मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी, तालुक्याची सरासरी उत्पादकता गेल्यावर्षी ३५ क्विंटल प्रति हेक्टर आली आहे. येत्या हंगामात मका पिकात ५ ते ७ क्विंटल उत्पादन वाढ होण्यासाठी कृषी विभागाने उत्पादन वाढीचे सूत्र निश्चित केले आहे. यामध्ये ॲझोटोबॅक्टर, पी.एस.बी. या जैविक खतांची बीज प्रक्रिया, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताची मात्रा, बी.बी.एफ. यंत्राद्वारे मका पिकाची पेरणी, लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये पक्षी थांबे व कामगंध सापळ्यांचा वापर निश्चित केला आहे. बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना बांधावर जाऊन करून दाखवले जात आहे. पक्षी थांबे व कामगंध सापळे हे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात कीड नियंत्रणासाठी पहारेकरी म्हणून कसे उपयोगी पडतात, याचे मार्गदर्शन केले जात आहे. एक गाव एक वाण अभियान कपाशी पिकात राबविले जात आहे. कोट....
महाडीबीटी योजनेअंतर्गत नांदगाव तालुक्यातील ५२८ शेतकऱ्यांचा बाजरी, मका, तूर या पिकांच्या ऑनलाईन लॉटरीमध्ये नंबर लागला आहे. यंदा मका व कपाशी यांचे सरासरी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीतल्या संशोधनातून मिळालेल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग शेतकरी वर्गाने करावा, यासाठी संपूर्ण कृषी विभागाची टीम बांधावर जाऊन काम करत आहे.
- जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी