केवळ १४०० शेतकऱ्यांच्याच मक्याला मिळाला हमीभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 07:54 PM2020-12-16T19:54:42+5:302020-12-17T00:49:33+5:30
नाशिक : जिल्ह्यात यावर्षी मक्याचे पीक चांगले आले असतानाही मार्केटिंग फेडरेशनने दीड महिन्यात जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवर केवळ १४६७ शेतकऱ्यांची ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी केली असून, त्यापैकी फक्त ५२९ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत पेमेंट अदा करण्यात आले आहेत. केंद्राच्या लालफितीच्या कारभारामुळे हजारो शेतकरी अद्याप मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्र शासनाने मक्याला १८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी खुल्या बाजारात एकाही व्यापाऱ्याकडून हमीभावाने मका खरेदी केली जात नाही. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभावाने मका खरेदी करण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण ९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रे सुरू झाल्यानंतर २ नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकूण ९०९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी फक्त ३९८१ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माल आणण्याचे एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १४६७ शेतकऱ्यांचा ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मालापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांना पेमेंट अदा करण्यात आले आहे.
सरकारी काम, सहा महिने थांब
खरेदी केंद्रांचा कारभार पहाता ह्यसरकारी काम आणि सहा महिने थांबह्णचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. केंद्रांवर शेतकऱ्यांना प्रथम ऑनलाइन नोंदणी करून केंद्राकडून येणाऱ्या एसएमएसची वाट पहावी लागते. एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांना आपला माल केंद्रावर घेऊन जावा लागतो. त्यानंतर पेमेंट खात्यावर वर्ग होण्याची वाट पहावी लागते. याउलट खुल्या बाजारात थेट वक्री होऊन लगेचच पैसे मिळत असल्याने खुल्या बाजाराला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.
फक्त २ शेतकऱ्यांना मिळाली ज्वारीची रक्कम
ज्वारीला २६२० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात असला तरी जिल्ह्यातील केवळ ८९ ज्वारी उत्पादकांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले, पैकी फक्त ४२ शेतकऱ्यांची ९८३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत देवळा तालुक्यातील २ शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीची रक्कम अदा करण्यात आली आहे.