नाशिक पोलीस दलात मोठे फेरबदल; उपआयुक्त अमोल तांबे, विजय खरात यांची बदली
By अझहर शेख | Published: November 7, 2022 11:19 PM2022-11-07T23:19:41+5:302022-11-07T23:34:29+5:30
राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिकच्या उपायुक्तपदी मुंबईच्या बंदरे परिमंडळाच्या गीता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे
नाशिक : राज्य शासनाच्या गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी (दि.७) काढले. या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात तसेच लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी), अधीक्षक अजय देवरे यांची परजिल्ह्यांत बदली करण्यात आली आहे. शहराला तीन नवे उपायुक्त मिळाले असून राज्य गुप्तवार्ता नाशिक विभागाच्या उपायुक्त शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील भा.पो.से. व म.पो.से. दर्जाच्या १०४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले. यामुळे शहर पोलीस आयुक्तालयासह महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्त वार्ता, गुन्हे अन्वेषण विभागात मोठे फेरबदल झाले. त्यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बदलीने पदस्थापना झाली आहे. सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग (रेल्वे) पोलीस अधीक्षकपदी, अमोल तांबे यांची पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी, तर गुन्हे अन्वेषणचे अजय देवरे यांची लातूरच्या अपर अधीक्षकपदी बदली करण्यात आली. उपायुक्त विजय खरात यांची महासंचालक कार्यालयातील दक्षता विभागाच्या सहायक महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिकच्या उपायुक्तपदी मुंबईच्या बंदरे परिमंडळाच्या गीता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या सीआयडीच्या अधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे उपआयुक्त इप्पर मंचक ज्ञानोबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयुक्तालयातील तांबे, खरात व बारकुंड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदांवर नाशिक ग्रामीणचे अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी, राज्य फोर्स-१ मुंबईचे किरणकुमार चव्हाण तसेच धुळे येथील अपर अधीक्षक प्रशांत जगन्नाथ बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरी हक्क संरक्षण नाशिकचे उपायुक्त अकबर पठाण यांची मुंबई शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणमधील खांडवी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकादमीचे अधीक्षक गौरव सिंग यांची मुंबईत उपायुक्तपदी, तर दीपाली काळे यांची सोलापूरला उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.