नाशिकमध्ये उद्धवसेनेत मोठे फेरबदल, डीजी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख तर बडगुजर यांना उपनेतेपदी पदोन्नती
By संजय पाठक | Updated: March 6, 2025 11:34 IST2025-03-06T11:33:58+5:302025-03-06T11:34:34+5:30
विधानसभा निवडणुकीत नाशिकमधील सर्व उमेदवार पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवून संघटनात्मक फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते.

नाशिकमध्ये उद्धवसेनेत मोठे फेरबदल, डीजी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख तर बडगुजर यांना उपनेतेपदी पदोन्नती
- संजय पाठक
नाशिक- विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक मध्ये उद्धवसेनेत मोठे खांदेपालट करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांची पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही पदांची आज घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधील सर्व उमेदवार पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवून संघटनात्मक फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी सध्याचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या ऐवजी अन्य व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची सांगितले होते. त्यासाठी आपसात चर्चा करून एकच नाव सुचवावे असेही सांगितले होते दरम्यान पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क मंत्री खासदार संजय राऊत यांनी नाशिक मध्ये तीन चार वेळा दौरे केल्यानंतर आता हे बदल करण्यात आले आहेत. डी जी सूर्यवंशी सुमारे 30 ते 32 वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. दोन वेळा त्यांनी नगरसेवक पद ही भूषवले आहे. सध्या पक्षाच्या कोअर कमिटीत देखील त्यांचा समावेश असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह अनेक प्रबळ दावेदार असताना पक्षाने सूर्यवंशी यांना संधी दिली आहे.
सुधाकर बडगुजर यांना मात्र वर्षभरात दुसऱ्यांदा पदोन्नती मिळाली आहे. बडगुजर हे लोकसभा निवडणुकीपर्यंत महानगर प्रमुख होते. मात्र त्यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना थेट उपनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. सध्या नाशिकमध्ये सुनील बागुल उपनेते असून आता सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाली आहे. या पूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याकडे देखील उपनेते पद होते मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.