मकर संक्रात पारंपरिक पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:12 AM2021-01-15T04:12:54+5:302021-01-15T04:12:54+5:30
टेहरेला पिकअप शेड उभारण्याची मागणी मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील तालुक्यातील टेहरे येथे बस स्टॉप व पिकअप शेड नसल्याने ...
टेहरेला पिकअप शेड उभारण्याची मागणी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील तालुक्यातील टेहरे येथे बस स्टॉप व पिकअप शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत. परिणामी प्रवाशांना मालेगाव बसस्थानक गाठत बस धरावी लागत आहे. याठिकाणी बस थांबा देऊन लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
गिरणा धरणावर पर्यटकांची गर्दी
मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून गिरणा धरणाची ओळख आहे. सध्या गिरणा धरणात शंभर टक्के जलसाठा झाला आहे. याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. कोरोनामुळे जरा निवांत वेळ मिळाल्याने पर्यटक आता धरणाकडे गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे गिरणा धरणावरील व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.
सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजविण्याची मागणी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. टोल वसूल करणाऱ्या कंपनीला खड्डे बुजविण्याचा विसर पडला आहे. सर्व्हिस रोडवरून छोटी-मोठी वाहने प्रवास करीत असतात; मात्र खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
हॉटेल-ढाब्यांवर वाढली गर्दी
मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू आहे. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील व तालुक्यातील ढाबे, हॉटेलवर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे, निवडणुकीत कार्यकर्त्यांची चंगळ होताना दिसत आहे, तसेच शेती शिवारातही पाटर्यांचे फड रंगत आहेत.
पोलीस चौकीवर कर्मचारी नेमण्याची मागणी
मालेगाव : शहरातील पोलीस ठाण्यांतर्गत विविध ठिकाणी चौकी उभारण्यात आल्या आहेत; मात्र अल्लामा इक्बाल पूल, सटाणा नाका, पोलीस कवायत मैदान या ठिकाणी असलेल्या चौक्यांवर कर्मचारी दिसत नाहीत. चौकी केवळ नावापुरतीच उरली आहे. परिणामी परिसरात पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
दारूबंदी असलेल्या चंदनपुरीत सर्रास विक्री
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथे महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूची बाटली आडवी केली आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव देखील केला आहे. तरीदेखील चंदनपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे. गावठी दारूच्या धंद्याला ऊत आला आहे. पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई केली जात आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंदनपुरीत दारू पिणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.