प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघाताचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:52 PM2017-09-23T23:52:53+5:302017-09-24T00:28:16+5:30
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाती मृत्यू झाल्याचा पत्नीने केलेला बनाव आडगाव पोलिसांनी उघड केला आहे़ ३ आॅगस्ट २०१७ रोजी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरू नानक पेट्रोलपंपासमोर शरद संपत साळवे (३७, रा. श्रीपाद अपार्टमेंट, रामनाथनगर, आडगाव शिवार) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी राणी शरद साळवे व तिचा प्रियकर अनिल ताठे या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
नाशिक : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाती मृत्यू झाल्याचा पत्नीने केलेला बनाव आडगाव पोलिसांनी उघड केला आहे़ ३ आॅगस्ट २०१७ रोजी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरू नानक पेट्रोलपंपासमोर शरद संपत साळवे (३७, रा. श्रीपाद अपार्टमेंट, रामनाथनगर, आडगाव शिवार) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी राणी शरद साळवे व तिचा प्रियकर अनिल ताठे या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीत महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत पती शरद साळवे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव पत्नी राणी साळवे हिने रचला होता़ तर वैद्यकीय अहवालात अपघातात नव्हे तर डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने साळवेचा मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ पोलिसांनी या प्रकरणी प्रथम अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू ठेवला़ या घटनेनंतर काही दिवसांनी शरदचे आई-वडील व भावाने पोलीस ठाण्यात त्याची पत्नी राणी तिचा प्रियकर केबल व्यावसायिक अनिल ताठे यांच्या विरोधात संशय व्यक्त केला़ आडगाव पोलिसांनी राणी साळवेचा जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये तफावत आढळली, तर संशयित ताठे हा घटनेनंतर फरार होता़ शुक्रवारी ताठे शहरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास सापळा लावून अटक केली़ त्याची पोलीस स्टाईलने कसून चौकशी केल्यानंतर ताठेने राणीसोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली़ तसेच या प्रकरणाची शरदला भणक लागल्याने तो राणीवर लक्ष ठेवून असल्याने या दोघांना अडचण होत होती़ अखेर या दोघांनी प्लॅनिंग करून ३ आॅगस्टला रात्री शरद साळवे हा फ्लॅटमध्ये झोपलेला असताना डोक्यात वार करून त्याचा खून केला़
२५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
राणी व ताठे या दोघांनी शरदचा खून केल्यानंतर मृतदेह महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला़ पोलिसांनीही प्रथमदर्शनी अपघाताचा गुन्हा दाखल केला़ मात्र तपासाअंती हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली़ या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पुजारी, उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार संजीव जाधव, दत्ता खुळे, बोराडे यांनी ही कामगिरी केली़