देश टिकविण्यासाठी व्यसनमुक्त पिढी घडवा : बंडातात्या कराडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:46 PM2019-01-16T17:46:21+5:302019-01-16T17:46:53+5:30
आईवडिलांची संस्कारांची शिदोरी देताना मुलगी राणी लक्ष्मीबाई आणि मुलगा धर्मवीर संभाजीराजे यांच्या सारखे बनले पाहिजे अशी खुणगाठ बांधावी. मुलांना थोरांची चरित्रे सांगून त्यांच्या आदर्शावर चालायला शिकवा. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. देश टिकवायचा असेल तर व्यसनमुक्त व सदाचारी युवा पिढी घडली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रबोधनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे वै. रामगिरी महाराज सेवा संस्थानच्यावतीने आयोजित १८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनात ह. भ. प. बंडातात्या कराडकर बोलत होते. त्यांनी देशातील युवा पिढीची व्यसनांमुळे होणारी अधोगती, त्यांना असणारी संस्काराची गरज याबद्दल विवेचन केले. देश जागतिक महासत्ता व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने घरातून सुरूवात करायला हवी. इंग्रजी संस्कृतीचा अनुकरणातून आपण आपली स्वत:ची संस्कृती हरवून बसलो आहोत. छत्रपती शिवराय, राणी लक्ष्मीबाई, संभाजीराजे, नेताजी बोस यांच्यासारख्या विभूतींचे केवळ स्मरण न करता त्यांच्यात असणारी राष्टÑभक्ती, समाजाबदलाच्या जबाबदारीची जाणीव आणि संस्कृतीक संवर्धन हे गुण प्रत्येक मुलामुलीत उतरवले पाहिजे यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. वीरपत्नी व वीरपित्याचा गौरवदेशाच्या सीमेवर तैनात असलेल्या तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा गोसावी, वीरपिता सोमगिर गोसावी यांचा यावेळी बंडातात्या कराडकर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. शहीद केशव यांचे हौतात्म्य, त्यांची कौटुंबिक परिस्थिती, गरोदर असेलेली पत्नी व वडिलांची दाखवलेली धीरोदत्तता याबाबत माहिती सांगत असताना ह. भ. प. पांडुरंग महाराज गिरी यांच्यासह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. ‘भारत माता की जय’च्या घोषात शहीद गोसावी यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.