अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करा : सीईओंचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 07:44 PM2017-09-14T19:44:24+5:302017-09-14T19:44:28+5:30
नाशिक : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असल्याने त्याचा थेट परिणाम पोषण आहारावर होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन पर्यायी व्यवस्था करून बालकांना अंगणवाडीत पोषण आहार उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.
१३ सप्टेंबरलाच यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी हे पत्र गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी (अंगणवाडी सेविका/ मदतनीस) यांनी ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला असून, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा अखंडपणे होणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने संपामुळे कुपोषित बालके व अंगणवाडीतील पोषण आहाराचे लाभार्थी बाधित होऊ नये पोषण आहार पुरवठ्यात खंड पडू नये यासाठी आहार वाटपाच्या कामात स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचारी जसे आशा कर्मचारी, आरोग्य सहायक, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळा शिक्षक, ग्रामशिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम-ताजा आहार पुुरविणाºया महिला बचतगट आदींच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था म्हणून आहार वाटपाचे काम करून घेण्याबाबत नियोजन करावे, असे म्हटले आहे.