बाटली ‘आडवी’ करण्यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:20 AM2017-07-23T01:20:50+5:302017-07-23T01:21:04+5:30
सद्या नाशकातील रहिवाशी क्षेत्रात असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांविरोधात महिलांची आंदोलने जोर धरू लागली आहेत.
साराश
किरण अग्रवाल
शक्तिस्वरूपा नारी जेव्हा एखाद्या तंट्याच्या निमित्ताने रस्त्यावर उतरते तेव्हा तो विषय तडीस गेल्याशिवाय राहात नाही म्हणूनच की काय, सद्या नाशकातील रहिवाशी क्षेत्रात असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांविरोधात महिलांची आंदोलने जोर धरू लागली आहेत. समाजस्वास्थ्य राखण्यासाठी महिला-भगिनींनी घेतलेला पुढाकार व त्याकरिता चिवटपणे चालविलेली झुंज खरेच वाखाणण्यासारखीच म्हणायला हवी. महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अशी दुकाने आता महामार्गावरून शहरात स्थलांतरित होत आहेत. यातील जी दुकाने रहिवासी सोसायट्यांतील गाळ्यांमध्ये सुरू होऊ घातली आहेत, त्यांना तेथील नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. नाशकात अलीकडे सुरुवातीला अंबडमध्ये एका दुकानाला तसा विरोध झाला, त्यानंतर सातपूर, पंचवटी, मखमलाबाद, तिडके कॉलनी, अशोका मार्ग अशा सात-आठ ठिकाणी आंदोलने घडून आलीत. यात लक्षात घेता येणारी बाब म्हणजे, जी दुकाने पूर्वीपासून रहिवाशी क्षेत्रात आहेत त्याबाबत फारसा वाद नाही, मात्र नव्याने जी सुरू होऊ घातली आहेत त्यांना तीव्र विरोध होतो आहे. विशेषत: महिलावर्ग यासाठी आक्रमकपणे पुढे आलेला दिसतो आहे. एका ठिकाणच्या महिलांची यासंदर्भातील जागरूकता पाहता दुसऱ्या ठिकाणच्या महिला त्यापासून प्रेरणा घेत पुढे होत आहेत. अशा साखळी पद्धतीने ठिकठिकाणी हे लोण पसरले आहे. अर्थात, दारूचे दुकान विक्रीसाठी असले तरी तेथे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे आपापसात होणारे वाद, त्यातून परिसरातील लहान मुले, महिलांना होणारा त्रास या सर्वांच्याच परिणामी नकोच ही दुकाने, अशीच रहिवाशांची भूमिका आहे. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात अशी दुकाने सुरू करताना सोसायटीतील रहिवाशांचा ना हरकत दाखला न घेताच किंवा आक्षेप विचारात न घेताच काही ठिकाणी त्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना अंधारात ठेवून दुकाने चालविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळेही संतप्त झालेल्या महिलांनी दुकानदारांचे साहित्य रस्त्यावर फेकून व दारू बाटल्यांची नासधूस करून आपला विरोध प्रदर्शित केला आहे. ग्रामीण भागात यासंदर्भात ‘बाटली आडवी’ करताना ग्रामसभेचा किंवा महिलांच्या विशेष सभेचा ठराव करून अथवा मतदानाद्वारे लोकभावना जाणून निर्णय घेतला जात असतो. अशी अनेक उदाहरणे देता येणारी असून, दारू दुकाने बंद करण्याच्या लढ्यातून पुढे आलेल्या रणरागिणींचे वेळोवेळी कौतुक व सत्कारही झालेले आहेत. नाशकात मात्र असे अपवादाने घडले. परंतु आता महामार्गावरील दुकाने शहराच्या रहिवाशी क्षेत्रात स्थलांतरित होऊ लागल्याने येथेही महिला भगिनींचा उठाव घडून येत आहे. दिवसेंदिवस या चळवळी बलशाली होतानाही दिसत आहे. स्थानिक रहिवाशांचा विरोध पाहता आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींनाही यात लक्ष पुरवावे लागत आहे. कारण उद्या मतांसाठी पुन्हा याच नागरिकांच्या दारात जावे लागणार आहे. यादृष्टीने महिलावर्गाच्या यातील पुढाकार महत्त्वाचा असून, समाज स्वास्थ्याबद्दलची त्यांची जागरूकता यानिमित्ताने दिसून येत आहे.