सणाचे गोडधोड बनवा १६० ग्रॅम साखरेत
By admin | Published: October 30, 2015 12:02 AM2015-10-30T00:02:22+5:302015-10-30T00:24:16+5:30
सणाचे गोडधोड बनवा १६० ग्रॅम साखरेत
नाशिक : राज्य सरकारची वर्षपूर्ती व त्याला लागूनच दिवाळी सण आल्याने यंदा दिवाळी जोरात होण्याची भाबडी आशा बाळगून असलेल्या गोरगरिबांच्या पदरी निराशाच पडली असून, सणासाठी गोडधोड करण्यासाठी रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना फक्त १६० गॅ्रम साखर अतिरिक्तदेण्यात येणार आहे.
दिवाळी सणासाठी लाडू, करंजी, शंकरपाळे असे गोडधोड पदार्थ केले जातात; परंतु सध्या बाजारात साखरेचे भाव सामान्यांना परवडेनासे झाल्याने गोरगरिबांसाठी साखरेचे पदार्थ खाणेच काय, पण तयार करणेही अशक्य असल्याचे पाहून राज्य सरकारने दिवाळी सणासाठी गोरगरिबांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अन्नपूर्णा, अंत्योदय व अन्नसुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मिळणार असून, प्रति माणसी फक्त १६० ग्रॅम अतिरिक्त साखर दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी नोव्हेंबर महिन्यासाठी १४१०१ मेट्रीक टन साखर मंजूर करण्यात आली असून, साखरेसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दरमहा मिळणारी ५०० ग्रॅम व त्यावर सणाची अतिरिक्त१६० ग्रॅम अशा प्रकारे ६६० ग्रॅम साखर रेशनमधून येत्या दोन दिवसांत वाटप केली जाणार आहे.
खुल्या बाजारात साखरेची काहीही किंमत असली तरी, रेशनमधून १३ रुपये ५० पैसे या दरानेच ती दिली जाणार असली तरी, १६० ग्रॅम साखरेत दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शिधापत्रिकांना पडला आहे. शासनाने त्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त किमान प्रती मानसी एक किलो साखर स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)