शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करावी
By admin | Published: September 16, 2015 11:20 PM2015-09-16T23:20:32+5:302015-09-16T23:21:51+5:30
स्वरूपानंद सरस्वती : भारत साधू समाजाचे कुंभ महाअधिवेशन
त्र्यंबकेश्वर : प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांत संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधिश्वर तथा द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले. भारत साधू समाजाच्या कुंभ महाअधिवेशनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या या अधिवेशनास स्वामी सागरानंद सरस्वती, जुन्या आखाड्याचे महंत नारायणगिरी महाराज, अग्नि आखाड्याचे सचिव महंत गोविंदानंद ब्रह्मचारी, उदासीन बडा आखाड्याचे सचिव महंत दुर्गादास, निम्बाकाचार्यांचे उत्तराधिकारी श्यामशरण, संतोष मुनीजी, रामकृष्णदास, कबीर पंथाचे निर्मलदास, धर्माचार्य हरिनारायणानंद, दंडीस्वामीअनि मुक्तेश्वरानंद सरस्वती, महंत जनमेजयशरण (अयोध्या), महंत नारायणगिरी, महंत गंगादास, महाधिवेशन प्रभारी श्री महंत गोपालानंद, सभापती अग्नि आखाडा आदि साधू-महंत, पदाधिकारी उपस्थित होते.
स्वरूपानंद पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वजण कुशावर्त कुंडात, नाशिकच्या गोदावरीत सिंहस्थ स्नान करून पवित्र व्हाल आणि त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन अपवित्र होणार हे योग्य आहे काय? सनातन धर्मातील देवदेवतांच्या मंदिरातील साईच्या मूर्ती, प्रतिमा हटविण्यात, सर्व साधू-संतांनी यासाठी प्रयत्न करावेत, संसदेत राममंदिर बांधण्याचा कायदा करावा, देशभर गोवंश हत्त्याबंदीचा कायदा करावा, धर्म परिवर्तन होऊ नये म्हणून साधूंनीच पुढाकार घ्यावा यांसह १३ प्रस्ताव या महाधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्याला सर्व साधू-महंतांनी हात वर करून दुजोरा दिला.
इतर धर्मातील लोकांना धार्मिक कार्यासाठी स्वदेशातील पैसे येतात तर सरकार आमचे मठ-आश्रम-मंदिरे यांना कर लावत आहेत. त्यामुळे हा कर आकारणीचा कायदा रद्द करावा. सरकार धर्मनिरपेक्ष असू शकते पण व्यक्तिनिरपेक्ष असूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या धर्माचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शाळा, विद्यालय, महाविद्यालयांतून रामायण, महाभारत, भगवद्गीता शिकवावी, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. हरेरामाचार्य रामकृष्णानंद, निम्बाकाचार्य, महंत दुर्गादास आदिंनी प्रस्तावांचे वाचन केले. तर महामंत्री स्वामी हरिनारायणानंद यांनी सूत्रसंचालन केले.