विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा: अपूर्वा जाखडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:53 PM2019-08-20T22:53:24+5:302019-08-21T01:04:12+5:30
अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
नाशिक : अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष वक्त्या म्हणून जाखडी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी जाखडी यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनविण्याचे आवाहन करतानाच त्यांना अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे स्पष्ट केले. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांवर पालकांनी आपले मते न लादता त्यांचा कल जाणून घेत त्यांच्या करिअरचे भवितव्य ठरविण्याची गरज असल्याचे सांगत तणावमुक्त शिक्षण देण्याचे आवाहन केले. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष सुनील निकुंभ यांनीही समाजातील शैक्षणिक उन्नतीबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना नवनवी आव्हाने खुणावत असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप खैरनार व पल्लवी कापडणे यांनी केले. व्यासपीठावर समाज संस्थेचे निमंत्रित विश्वस्त अमरशेठ सोनवणे, उपाध्यक्ष मुकुंद मांडगे, मुख्य सचिव संजय खैरनार, कार्यालय प्रमुख हेमंत सोनवणी, महिला कार्याध्यक्ष वंदना जगताप, महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष सुनीता शिंपी, राजेंद्र वाडीकर, ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र जगताप, सचिव मयूर सोनवणे, महिला अध्यक्ष प्रफुल्लता सोनवणी, सहसचिव रोशनी देवरे आदी उपस्थित होते.
पूरग्रस्तांसाठी मदतनिधी
विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने यावेळी सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी २१ हजार रुपयांचा मदतनिधी सुपुर्द करण्यात आला. याचबरोबर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यंदाही ट्रस्टतर्फे नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.