प्रेसमध्ये इ-पासपोर्ट छपाईचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:04 AM2022-03-21T01:04:12+5:302022-03-21T01:04:47+5:30
भारत प्रतिभूती मुद्रणालयात व्यावसायिक तत्त्वावर ई-पासपोर्ट छपाई लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ई पासपोर्ट मशीन खरेदीसाठी जागतिक टेंडर काढण्याकरिता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आयएसपी प्रेस मजदूर संघाला त्याबाबतचे निर्देश मिळाले असल्याची माहिती मजूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. यामुळे कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
नाशिकरोड : येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात व्यावसायिक तत्त्वावर ई-पासपोर्ट छपाई लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ई पासपोर्ट मशीन खरेदीसाठी जागतिक टेंडर काढण्याकरिता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आयएसपी प्रेस मजदूर संघाला त्याबाबतचे निर्देश मिळाले असल्याची माहिती मजूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. यामुळे कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
चलनी नोटांची छपाई करणाऱ्या करन्सी नोट प्रेसच्या जुन्या मशीनरींच्या जागी नवीन मशीनरी उभारण्यासही सरकारने परवानी दिली आहे. मुद्रांक, धनादेश, मद्याचे सील, पोस्टाची तिकिटे आदींची छपाई करणाऱ्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात एट कलर शीट फिडिंग वेट अँड ड्राय ऑफसेट प्रिंटिंग मशिन, शीट फीडन प्रोग्रामेबल लेजर मायक्रो परफोटिंग मशीन, एमआयसीआर चेक प्रिंटींग मशीन (शीटफेड), स्टिचिंग मशीन, केसिंग मशीन, फिनिशिंग मशीन या लवकरच मिळणार आहेत. पासपोर्टला लागणारा पेपर, इन ले आदी साहित्य तयार करण्याबाबतही अर्थ व संबंधित खात्यांबरोबर चर्चा झाली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली १५ व १६ मार्चला मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, उपाध्यक्ष कार्तिक डांगे व प्रवीण बनसोडे हे दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांना भेटले. टेंडर काढण्यासाठी येत असलेल्या अडचणी यावर चर्चा केली. याआधी प्रेस मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, भागवत कराड, पंकज चौधरी, वित्त सचिव अजयशेठ, प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल आदींचीही याबाबत वेळोवेळी भेट घेत दोन्ही प्रेसच्या आधुनिकीकरणाबाबत आग्रही मागणी केली.