ग्राहकांची आवड-निवड पाहूनच करा द्राक्ष उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:51 PM2019-01-18T15:51:01+5:302019-01-18T15:51:19+5:30
कळवण : द्राक्षशेतीसमोर विक्र ी व्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. ...
कळवण : द्राक्षशेतीसमोर विक्र ी व्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. चिली, पेरू, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांत आपल्या बागेतील प्रत्येक घड निर्यातक्षम राहील या दृष्टीनेच नियोजन केले जाते. ग्राहकांची आवड, निवड, क्षमता याचा अभ्यास करूनच यापुढे द्राक्ष उत्पादनाकडे पाहावे लागणार आहे. ही जबाबदारी व्यापारी किंवा वितरकांवर न टाकता शेतकरी म्हणून पुढे येण्याची गरज असल्याचे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण जवळील वाडी बु. येथील निर्मल फार्मवर द्राक्ष पिकांच्या निर्यात, रोग व कीड व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद ढोकरे, मंगेश भास्कर, सुरेश कळमकर, कळवणचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार, प्रगतशील शेतकरी गंगाधर पगार ,तालुका कृषी अधिकारी विजय पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना विलास शिंदे यांनी सांगितले की, व्यवसाय म्हणून शेती करण्याची गरज आहे.शेतीचे प्रश्न आता आपल्यालाच सोडायचे असून शास्त्रीय पध्दतीने शेतीचे नियोजन करु न उद्योग व्यवसाय म्हणून शेतीकडे पहावे. येत्या काळात गोड चवीबरोबरच जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन घेतले, तर भारतीय द्राक्षांना उज्ज्वल भवितव्य राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी तर अरु ण मोरे , डी.बी.राजपूत, डी.व्ही.साळुंखे यांनी द्राक्ष व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सूत्रसंचालन केले.