मखमलाबाद शिवार : गंगावाडीत बिबट्याचा संचार बिबट्यासाठी लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:59 AM2018-02-05T00:59:28+5:302018-02-05T00:59:54+5:30
पंचवटी : मखमलाबाद शिवार गंगावाडी परिसरातील शेतात व मळे भागात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने सध्या दहशतीचे वातावरण आहे.
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद शिवार गंगावाडी परिसरातील उसाच्या शेतात व मळे भागात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने सध्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. मुक्तपणे संचार असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शनिवारी (दि.३) वनविभागाने परिसरात पिंजरा लावला आहे. गुरुवारी (दि.१) सकाळच्या सुमाराला बागड व गामणे मळ्यात काही शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले होते. गुरुवारी वनविभागाच्या पथकाने गामणे व बागडे मळ्यात पाहणी केल्यानंतर पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले होते त्यानुसार शनिवारी पिंजरा लावण्यात आला. गंगावाडीत गेल्या गुरुवारी सकाळच्या सुमाराला शेतात काम करणाºया सखाराम थाळकर व पप्पू तिडके यांना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेबाबत जवळच राहणाºया पंडित तिडके यांना माहिती कळविली होती. तिडके यांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला मात्र उसाचे शेत व दाट झाडी असल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. सध्या या भागात पिंजरा लावला असला तरी दिवसाही शेतात जाणाºया नागरिकांत बिबट्याची दहशत कायम आहे.
वनविभागाच्या पथकाकडून पाहणी
गंगावाडीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वनविभागाला कळविताच गुरुवारी वनविभागाच्या पथकाने तसेच नागरिकांनी परिसरात धाव घेऊन पाहणी केली.परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने वनविभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. आता शनिवारी वनविभागाने पुन्हा गंगावाडीतील शेतमळे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावण्याचे काम करण्यात आले आहे.