मखमलाबादला तिघांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:34 PM2019-03-19T22:34:39+5:302019-03-20T01:04:59+5:30
मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली.
पंचवटी : मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघा संशयितांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रोहित पवार, अभिषेक गिरी, प्रकाश शेंडगे व सनी शेलार हे चौघेजण गवळी यांच्या हॉटेलजवळ गप्पा मारीत असताना संशयित आरोपी हातात धारदार शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी तुम्ही माजले का गँग बनवीत आहे, सर्वांना मारून टाका, असे म्हणत शेंडगे याच्यावर वार केला, त्यावेळी पवार व गिरी हे निघून जात असताना सर्व संशयितांनी त्यांना अडवून तुम्ही किरण भडांगे यांच्यासमवेत राहून गँग बनवून आमच्या गावात दादागिरीसाठी येता का, असे म्हणून दोघांवर कोयत्याने व काठीने हल्ला चढविला. त्यानंतर मारहाण झालेले युवक मित्राच्या चारचाकीतून जात असताना संशयितांनी कारच्या काचा फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मारहाणप्रकरणी शांतीनगर पिंगळे मळा येथे राहणाऱ्या रोहित योगेश पवार यांनी दिलेल्या तक्रार दिली असून, मखमलाबाद येथील पंकज दराडे, श्रावण भसरे, सुनील धोत्रे, नितीन पिंगळे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकीत शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक
मखमलाबाद गावात बसस्थानकाशेजारी रस्त्यात उभ्या असलेल्या फॉर्च्युनर चारचाकीत धारदार तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी मखमलाबादच्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चारचाकी व शस्त्र जप्त केले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे कर्मचारी गणेश रेहरे व त्यांचे सहकारी रविवारी रात्री मखमलाबाद गावात गस्त घालीत असताना फॉर्च्युनर या चारचारी वाहन (क्रमांक एमएच १५, एफटी ५९९९) रस्त्याच्या मध्यभागी संशयास्पद उभी दिसली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता गाडीत एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी प्रवीण ज्ञानेश्वर काकड आणि मयूर बाळासाहेब दराडे या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.