केंद्राच्या मलेरिया समितीकडून मनपाची कानउघाडणी
By Suyog.joshi | Updated: July 4, 2024 20:46 IST2024-07-04T20:46:30+5:302024-07-04T20:46:40+5:30
समितीने महापालिकेच्या मलेरिया विभागाची कानउघाडणी करत लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या.

केंद्राच्या मलेरिया समितीकडून मनपाची कानउघाडणी
नाशिक : शहरात वाढणाऱ्या डेंग्यूच्या रूग्णांच्या संख्येची गंभीर दखल घेत केंद्राच्या मलेरिया समितीने गुरूवारी (दि. ४) तातडीने शहरात ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. समितीने महापालिकेच्या मलेरिया विभागाची कानउघाडणी करत लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांसह इतरही विभागांना डेंग्यूबाबत सहभागी करुन घेण्यात यावे. याबाबतही अवगत करण्यात आले. शहरात आजमितीला डेंग्यू रूग्णसंख्या २६९ वर पोहोचली आहे.
शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनत असल्याने केंद्रीय मलेरिया विभागाच्या समितीतील महाराष्ट्र गोवा व दीव दमन विभागाच्या प्रमुख डॉ. सरीता सकपाळ यांच्यासह डॉ. अलोने, किटकशास्रज्ञ माने आदींनी बुधवारी शहर गाठले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेपर्यत शहरातील विविध भागात जाऊन त्यांनी पाहणी केली. मलेरिया विभागाला सूचना दिल्यात. नागरिकांनी अडगळीला पडलेले भंगार, रिकामे टायर, बाटल्या यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. बांधकाम व्यावसायिकांना कडक सूचना देऊन डास उत्पत्ती केंद्र निर्माण होणार नाही. याबाबत लक्ष देण्यास सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा शहरात डेंग्यूने डंख मारला असून रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हतबल झाला असून उपाययोजना सुरु आहे.