मालधक्का झाला ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: June 4, 2015 12:05 AM2015-06-04T00:05:33+5:302015-06-04T00:34:22+5:30
कोट्यवधी रुपयांचा माल : बंद राहण्याच्या अफवेचा परिणाम
नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मालधक्का तीन-चार महिने बंद राहणार असल्याची चर्चा व अफवा पसरल्याने सीमेंट, खत कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा जादा माल पाठविण्यात आल्याने रेल्वे मालधक्का प्लॅटफॉर्म व गुदाम हाऊसफुल्ल झाले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला असून, पर्वणीच्या काळात तीन-चार महिने रेल्वे मालधक्का बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा असून, तशी अफवादेखील पसरली आहे. मालधक्का बंद ठेवण्याबाबतचा अद्याप रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, सेंट्रल रेल्वे साईड वेअरहाऊस मालधक्का बंद ठेवण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सीमेंट, खत, स्टीलच्या कंपन्या, व्यापारी, कार्टिंग एजंट यांना कुंभमेळा तोंडावर आला असतानासुद्धा रेल्वे मालधक्का सुरू ठेवणार की बंद राहणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कळविलेले नाही. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कंपन्यांनी घेतली धास्ती
पावसाळ्यात बाजारात खताला मोठी मागणी असते. पर्वणी काळात मालधक्का बंद ठेवण्याचा निर्णय झाला तर बाजारात सीमेंट, खत, स्टीलचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ, काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धास्तावलेल्या सीमेंट, खत, स्टीलच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर माल पाठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत सीमेंट, खतांच्या विविध कंपन्यांचा सात रॅकमधून माल आला आहे. पाच रॅक रस्त्यात असून, गुरुवार-शुक्रवारी नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पोहचतील.
पाय ठेवायला जागा नाही
मालधक्क्यावर मोठ्या प्रमाणात सीमेंट, खत येत असून, ते रेल्वेच्या रॅकमधून उतरवून लागलीच खासगी ट्रकने उचलून नेले जात आहे. तरीदेखील रेल्वे मालधक्का प्लॅटफॉर्म व गुदाम सीमेंट, खत, स्टीलने हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. दररोज २५०-३०० ट्रकमधून रेल्वे रॅकमधून आलेला माल वाहून नेला जात आहे. सध्या सेंट्रल वेअर हाऊसच्या गुदाममध्ये अन्नधान्याच्या गोण्या ठेवायला जागा नसल्याने आठ दिवसांपूर्वी रेल्वेने आलेले अन्नधान्य मनमाडला पाठवून दिले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा व त्यामुळे मालधक्का सुरू राहणार की बंद याचा निर्णय भिजत पडल्याने कंपन्या, व्यापारी, कार्टिंग एजंट, माथाडी कामगार, ट्रक चालक-मालक यांनी धास्ती घेतली आहे. (प्रतिनिधी)