महिलांच्या हक्कासाठी लढणारा पुरुष कार्यकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:33 AM2019-03-10T01:33:03+5:302019-03-10T01:33:50+5:30
नाशिक : महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या हक्काचा जागर केला जातो आणि हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महिला किंवा त्यांच्या संस्थांचा आवर्जून ...
नाशिक : महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या हक्काचा जागर केला जातो आणि हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महिला किंवा त्यांच्या संस्थांचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाशिकमध्ये मात्र संतोष जाधव हा युवा कार्यकर्ता लोकनिर्णय या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असून, त्यांच्या प्रयत्नातून पाचशेहून अधिक महिलांची पतीच्या बरोबरीने घरावर नावे आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक जनसूनवाई झाल्याने महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीदेखील करण्यात येऊ लागली आहे.
नाशिक शहरातील फुलेनगर झोपडपट्टी हा कष्टकऱ्यांचा रहिवासी भाग. या भागात मोलमजुरी करणारी कुटुंबे मोठ्या प्रमाणात राहतात. त्याच भागात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून संतोष जाधव हे लोकनिर्णय संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत. या भागातील अज्ञान, निरक्षरता अशा बाबींमुळे अनेक अडचणी आहेत. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणातील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत सहजतेने त्यांनी कामे केली आहेत. येथील मुलांशी बोलताना अनेकदा कुटुंबातील मुला-मुलींमध्ये भेद होत असल्याचे लक्षात आले. घरातील डब्यांवर, भांड्यांवर मुलांचीच नावे असतात. मुलींना टाळले जाते, त्यावरून संबंधित कुटुंबांशी संवाद साधताना त्यांना जाणीव करून देण्यात आली. परंतु ही घरातील बाब त्यामुळे दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणची वस्तू म्हणजे घरावरील नेमप्लेट तेथे फक्त कर्त्या पुरुषाचेच नाव असते. त्यामुळे आई किंवा पत्नीचे नावदेखील टाकावे यासाठी कुटुंबांशी संवाद साधण्यात आला. महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला, शिवाय पुरुष मंडळीही तयार झाली आणि आज झोपडपट्टीत सुमारे पाचशे घरांवर महिलांची नावे दिसत आहेत.
रुग्णालयात झाल्या अनेक सुविधा उपलब्ध
याच भागात आरोग्याचा प्रश्न गंभीर होता. महापालिकेने याठिकाणी रुग्णालय बांधले परंतु त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने प्रसूती होत नव्हत्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयात कोणी दाखल झाले की, त्यांना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात किंवा तेथून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. २०१४ पासून या भागात तीन जनसूनवाई घेण्यात आल्या. ‘लोकनिर्णय’ने परिसरातील आणि रुग्णालयात दाखल महिलांचे सर्र्वेक्षण करून वस्तीत किती महिला प्रसूत झाल्या, त्यांची नोंदणी कधी झाली होती आणि त्यांना रुग्णालयातून काय सांगण्यात आले याचा सर्व्हेच करण्यात आला आणि तो मांडण्यात आल्याने आता रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ नियुक्त करण्यापासून ते सोनोग्राफीपर्यंतच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या.
आहेत.
मुंबईच्या कोरो या संस्थेच्या मदतीने कौटुंबिक हिंसाचार थांबविण्यासाठी समुपदेशन केंद्र चालवण्यात येते. कौटुंबिक वाद टळले नाहीत तर महिलांना विधी सेवा प्राधीकरणातून मोफत कायदेशीर मदतदेखील केली जाते. त्यामुळे अनेक महिलांना आधार मिळाला आहे.