मालेगाव @ ४०.२ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:16 AM2018-03-28T00:16:04+5:302018-03-28T00:16:04+5:30
शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.
मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे.
उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. दुपारच्या सत्रात रस्ते निर्मनूष्य होत आहे. सायंकाळपर्यंत कमालीचा उकाडा जाणवत होता. मार्च महिन्याच्या शेवटीच उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. एप्रिल व मे महिन्यात तपमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उन्हाचा अबालवृद्धांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, उपरणे आदिंचा उपयोग करीत आहेत. सोमवारी पारा थेट ३८ अंशांपर्यंत सरकल्याने अंगाची काहिली झाली. दुपारी १ पासून ते ४ वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. रविवारी कमाल तपमानाचा पारा ३७ अंशांपुढे सरकला होता; मात्र किमान तपमान कमी असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता व सूर्यास्त होताच उष्ण वातावरण तितक्याच वेगाने थंड होत होते. रात्री काही भागात थंड वाराही सुटल्याचे नागरिकांनी अनुभवले; मात्र सोमवारी कमाल व किमान तपमानात वाढ झाल्याने वाºयाचा वेग मंदावला व वातावरणात उष्माही जाणवत होता. वातावरणातील आर्द्रताही वाढू शकते, यामुळे उकाडा व घामाचा त्रास अधिक सहन करावा लागण्याची शक्यता आहे. उन्हामुळे उष्मा वाढत असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
३१ मार्चपर्यंत उष्ण वातावरण वाढणार असून, नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास बाहेर पडताना उन्हापासून बचावाची योग्य ती खबरदारी घ्यावी. घरातून निघताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.