मालेगावी सेना पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस कार्यालयावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 AM2021-09-08T04:20:10+5:302021-09-08T04:20:10+5:30
मालेगाव : ब सत्ता प्रकारातील मिळकती अ सत्ता प्रकारात करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने परिपत्रक ...
मालेगाव : ब सत्ता प्रकारातील मिळकती अ सत्ता प्रकारात करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने परिपत्रक काढले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कृषी मंत्री भुसे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्याचा निषेध म्हणून येथील मोसम पुलावरील काँग्रेस कार्यालयावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद कार्यालयावर दगडफेक केली. तसेच शासनाचे परिपत्रक चिटकवित जोरदार घोषणाबाजी केली.
कृषी मंत्री भुसे यांनी ब सत्ता प्रकाराची मिळकत अ सत्ता प्रकाराची करण्यासाठी मिळकतधारकांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन केले होते. मात्र ही संपूर्ण माहिती चुकीची असून भुसे यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन बच्छाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, राजेश अलिझाड व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कृषी मंत्री भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मंत्री भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. गेल्या ८ फेब्रुवारी २००६ ते १८ जून २०२१ पर्यंत झालेला पत्रव्यवहार, निर्णय व बैठकांची माहिती दिली. यानंतर काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली. या आंदोलनात सेनेचे महानगर प्रमुख मिस्तरी, सहसंपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, राजेश अलिझाड, अनिल पवार, राजू टिळेकर, भारत बेद, विजय गवळी, विजय सेंगर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----------------
राज्यात महाविकास आघाडी शासन सत्तेवर असताना काँग्रेस कार्यालयावर केलेल्या दगडफेकीचा प्रकार अशोभनीय आहे. सत्तेत असताना समान भूमिका बजावली गेली पाहिजे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ब सत्ता प्रकाराबाबत शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
--------------
कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे ब सत्ता प्रकारातील मालमत्तांचा प्रश्न निकाली निघाला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव वापरून काँग्रेसचे पदाधिकारी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. संबंधितांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे.
- रामा मिस्तरी, महानगर प्रमुख शिवसेना
फोटो फाईल नेम : ०७ एमएसईपी ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करताना शिवसेनेचे पदाधिकारी.
070921\07nsk_43_07092021_13.jpg
फोटो कॅप्शन बामती सोबत दिले आहे.