जिल्ह्यात मालेगावच ठरले हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:23 PM2020-04-17T23:23:44+5:302020-04-18T00:25:48+5:30
मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे.
मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे.
मालेगावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन जागे झाले असून इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या, मात्र बैठक आटोपून नाशिकला जात नाहीत तोच एकाच दिवसात १४ रुग्ण सापडल्याने प्रशासन कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लावू शकले नाही. यासंदर्भात डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मालेगावी यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील त्यांच्या नातेवाइकांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आज सापडलेले रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील त्यांचे नातेवाईक आहेत. आज मिळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील अन्य लोकांना उद्या शोधून काढून त्यांना क्वॉरण्टाइन करू. तसेच घरोघर सर्वेक्षण सुरू असून ४५ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मालेगावात पुरेसा औषध साठा असून रुग्ण व्यवस्थितरीत्या हाताळले जात आहेत.
दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे म्हणाल्या, आज मिळालेल्या १४ पॉझिटिव्ह रुग्णांना रात्रीच जीवन आणि मन्सुरा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. घरोघर सर्व्हे सुरू असून आज आढळून आलेले रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील नातेवाईक आहेत. हजारखोलीसह इतर भागदेखील सील केला असून प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेकडून अधिक काळजी घेतली जात आहे.
-------------
मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
नाशिक : मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या जागी नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची तातडीने अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून निकम हे शुक्रवारी (दि.१८) रोजी पदभार घेण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मालेगावची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत मालेगावचे अपर जिल्हाधिकरी राऊत यांना तडकाफडकी हटविण्यात येऊन नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मालेगावच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. निकम यांनी कोरोना संसर्ग रोखण्याविषयी कामकाजाबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुजू व्हावेत असे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, ५०च्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण मालेगावमध्ये आढळले आहेत. त्यामुळे येथील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निकम यांच्यापुढे आहे. निकम यांना तातडीने कार्यभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी राऊत यांना मात्र अद्याप कुठल्याही नियुक्तीबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यांच्या नियुक्तीबाबत यशावकाश आदेश निर्गमित केले जातील, असे शासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती हताळण्यात अपयश आल्याच्या कारणास्तव राऊत यांना हटविण्यात आले असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळवणचे प्रांत डॉ. पंकज आशिया यांना घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.