मालेगाव : भाजपाच्या सत्तेच्या वारूला लगाम; कॉँग्रेसचे मनपावर वर्चस्व
By Admin | Published: June 15, 2017 12:24 AM2017-06-15T00:24:46+5:302017-06-15T00:27:45+5:30
शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाले उपमहापौरपदअतुल शेवाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : केंद्रात व राज्यात भाजपाच्या सत्तेचा वारू चौफेर उधळत असताना, शिवसेना व कॉँग्रेसने युती करून महापालिकेवर सत्ता मिळवित भाजपाच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला आहे. एमआयएमची अप्रत्यक्षरीत्या रसद घेत कॉँग्रेसने महापौरपद, तर शिवसेनेने उपमहापौरपद पटकावले आहे. शहराच्या पूर्व भागात माजी आमदार रशीद शेख व पश्चिम भागात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. भाजपाच्या दोघा नगरसेवकांची अनुपस्थितीही कॉँग्रेस व शिवसेनेच्या पथ्यावर पडली.
महापालिकेची निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. महापालिकेत ८४ नगरसेवक निवडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे रशीद शेख व आमदार आसिफ शेख यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली होती, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनता दल आघाडीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
मनपाच्या इतिहासात शिवसेनेला महत्त्वाचे असलेले उपमहापौरपद आजपर्यंत मिळाले नव्हते. सखाराम घोडकेंसारख्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकाला उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. उपमहापौरपदाची संधी मिळाल्यामुळे शिवसेनेचे पश्चिम भागात वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भाजपाने या निवडणुकीत पहिल्यांदाच खाते उघडले होते. मात्र कॉँग्रेस व शिवसेनेच्या युतीमुळे भाजपाची कोंडी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनता दल आघाडीसोबत जाऊनही भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार सुनील गायकवाड यांना माघार घ्यावी लागली, तर भाजपाचे विजय देवरे व दीपाली वारुळे हे दोन नगरसेवक महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिले. ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनता दल, भाजपा मॅजिक आकडा गाठू नये म्हणून कॉँग्रेस व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरीत्या तोडफोडीचे राजकारण करून महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे. राज्याच्या राजकारणात कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे, तर शिवसेना-भाजपाचीही युती आहे. असे असताना मनपा निवडणुकीत मित्रपक्ष असलेले हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले होते.
पूर्व भागातील राजकारणात विद्यमान महापौर रशीद शेख यांचा वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर पश्चिम भागातही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा असल्याचे दिसून आले आहे. पंचायत समिती निवडणुकीतील पराभवाचा वचपा सेनेने महापालिका निवडणुकीत काढला आहे.या घडामोडीत कॉँग्रेस शिवसेनेला गळाशी लावण्यास यशस्वी झाली होती. शिवसेना व कॉँग्रेसने युती केल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसची कोंडी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाशी बोलणी करून महापौरपदासाठी पाठिंबा मिळविला; मात्र त्यांना सत्तेचा मॅजिक आकडा गाठता आला नाही. एमआयएमचे ज्येष्ठ नेते युनूस ईसा यांनी राजकीय खेळी करत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका बजावून माजी आमदार रशीद शेख यांच्याशी असलेला ‘दोस्ताना’ कायम ठेवला. केंद्रात व राज्यात भाजपाच्या सत्तेच वारूचौफेर उधळत आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी सत्ता मिळविण्यात भाजपाला यश आले असताना मालेगाव महापालिकेत मात्र भाजपाला चमत्कार दाखविता आला नाही. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुत्सद्दीगिरीचे राजकारण करत शिवसेनेकडे महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच उपमहापौरपद खेचून आणले आहे.