खैरनार बंधूंवर प्राणघातक हल्ला मालेगाव : राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुत्रासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:52 AM2017-12-20T01:52:41+5:302017-12-20T01:53:28+5:30
येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीे संचालक व अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईल अडवून त्यांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीे संचालक व अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईल अडवून त्यांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रसाद खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरनार व त्याचे मित्र रोहित भामरे, अक्षय राणा हे खरेदी करुन अद्वय हिरे यांच्या मालकीच्या क्र. एमएच १२ एफएफ ७८६ या कारने कॅम्परोडने जात असताना वनविभागाच्या कार्यालयाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण यांनी कार अडवून लाकडी दांडा व बॅटच्या साहाय्याने गाडीच्या काचा फोडल्या तसेच प्रसाद व त्याच्या मित्रांना मारहाण केली. तसेच पं. स. सदस्य गणेश खैरनार यांच्या एमएच ४१ व्ही ७७९१ या कारच्या काचा फोडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवसेना व भाजपा, हिरे समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या पं. स. सदस्य खैरनार यांच्यावर धुळे येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती अद्वय हिरे यांना मिळताच त्यांनी समर्थकांसह घटनास्थळी धाव घेतली. मारहाण करणाºयांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कॅम्प रस्त्यावर रात्रीच ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपअधिक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर हिरे यांनी छावणी पोलीस ठाण्यात समर्थकांसह धाव घेतली. रात्री उशिरा तिघा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ला व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एल. पाटील करीत आहेत.
भाजपातर्फे मूक मोर्चा
खैरनार बंधूंवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व संशयित आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भाजपा पदाधिकारी व हिरे समर्थकांनी मूक मोर्चा काढला होता.