मालेगाव : महापालिकेकडून मार्चअखेरच्या घरपट्टी वसुलीचा तगादा
By admin | Published: January 30, 2015 12:49 AM2015-01-30T00:49:05+5:302015-01-30T00:49:14+5:30
हद्दवाढीतील सहा गावांना करांचा भुर्दंड
मालेगाव- महापालिकेसमोर यावर्षी३८ कोटी ५६ लाख नऊ हजार रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट मनपाच्या घरपट्टी वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे असून, आतापर्यंत प्रत्यक्षात जानेवारीअखेर नऊ कोटी १८ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली आहे, तर गेल्या वर्षी १५ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली होती.
मालेगाव महापालिकेत द्याने, सोयगाव, म्हाळदे, भायगाव, सायने, दरेगाव या सहा गावांचा हद्दवाढीनंतर समावेश झाला. त्याला अडीच वर्षे झाली. त्यानंतर आता या गावांतील नागरिकांना गावांमध्ये पुरेशा सोयीसवलती मनपाने पुरविलेल्या नसताना सुमारे साडेसात कोटी रुपये घरपट्टीपोटी महापालिकेला मार्चअखेर जमा करावे लागणार आहेत.
मालेगावी डास मच्छरांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, मात्र नागरिकांंना घरपट्टीपोटी असंख्य प्रकारचे कर भरावे लागत आहेत. त्यात सर्वसाधारण कर, अग्निशमन, मलनिस्सारण, जललाभ, शिक्षण उपकर, वृक्षकर, पथकर, दिवाबत्ती, शिक्षण कर, सर्वसाधारण स्वच्छता आदि करांचा समावेश आहे. हद्दीवाढीनंतर मालेगाव महापालिका हद्दीत समाविष्ट गावांत कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत.
गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचेलेले असताना घंटागाड्यांचे दर्शनही या भागातील नागरिकांना कधी होत नाही. महापालिकेचे ३८ लक्ष ५६ लाख ९ हजार १३ रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षी १५ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली होती. हद्दवाढीतील सहा गावांना घरपट्टी आकारणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. ती किती आणि कशी वसूल करावी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.