मालेगावी कोरोनाबाधितांची शंभरी पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:42 PM2020-04-23T22:42:04+5:302020-04-24T00:14:18+5:30
मालेगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११0 वर पोहोचली असून सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरावरुन भीती व्यक्त होत आहे.
मालेगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११0 वर पोहोचली असून सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरावरुन भीती व्यक्त होत आहे. मालेगावात प्रशासनातर्फे कोरोनाला लगाम घालण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असताना रुग्ण बरे होण्याऐवजी मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनही हादरले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि कृषिमंत्री दादा भुसे गेल्या काही दिवसांपासून रोजच आढावा बैठक घेत असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण मिळून आले होते. त्यात ४ मालेगावचे तर १ चांदवडच्या रुग्णाचा समावेश होता. त्यानंतर दोनच दिवसात १० एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ झाली. शहराला लष्कराचे
स्वरूप असून, मालेगावात कोरोनाचे ९ रुग्ण आढळल्यानंतर त्या-त्या
भागाला सील करून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्ण असलेले परिसरातील रस्ते पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत.
----------------------
१३ एप्रिलला पहिला बळी
४ मालेगावातील २२ वर्षीय महिलेला धुळे येथे शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा १३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने ती कोरोनाबाधित महिला राहत असलेल्या नयापुरा भागाला सील केले तर त्याला जोडून असलेल्या भागालाही बफर झोन म्हणून बंद करण्यात आले.
जिल्हास्तरावरील यंत्रणेची धावपळ
मालेगावी कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर जिल्हास्तरावरील यंत्रणेची एकच धावपळ सुरू झाली. १०७ जणांचे स्त्रावाचे नमुने घेऊन ते तातडीने तपासण्यासाठी पाठविण्यात आले.
400 जणांच्या पथकाकडून सर्वेक्षण
मालेगाव शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी ४०० जणांचे पथक तयार करून घरोघर सर्वेक्षण सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल झपाट्याने येऊ लागले. त्यांच्या उपचारासाठी जीवन हॉस्पिटल, मन्सुरा हॉस्पिटलसह सायनेतील फार्मसी महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले.