मालेगावी गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 02:00 AM2022-03-11T02:00:46+5:302022-03-11T02:01:05+5:30
यंत्रमाग कारखानदाराची रोकड लुटणाऱ्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : यंत्रमाग कारखानदाराची रोकड लुटणाऱ्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गिरीश दिनकर निकुंभ या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. शहरातील सरदारनगर भागात बुधवारी (दि. ९) रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने यात पोलीस कर्मचारी जखमी झाले नाहीत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व्यापारी लूट प्रकरणातील संशयित आरोपी जमाल बिल्डर व सलमान (दोघांची पूर्ण नावे माहीत नाहीत.) सरदारनगर भागात आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार सुभाष चोपडा व निकुंभ संशयितांना पकडण्यासाठी गेले होते. यावेळी जमाल बिल्डर याने कमरेला लावलेला सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा बाहेर काढून निकुंभ यांच्या दिशेने गोळीबार केला. तसेच चोपडा यांच्याशी झटापट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रत्नपारखी करीत आहेत. दरम्यान, या व्यापारी लूटप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी साजीद अहमद रियाजअली (२४) व नबी अहमद शकील अहमद (२२) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नदीम अहमद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील तिघेजण फरार आहेत. संशयितांचा शोध घेतला जात आहे.