मालेगावच्या गुन्हेगाराकडून चार दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:24 PM2019-10-01T16:24:34+5:302019-10-01T16:27:09+5:30
महिला दुचाकीस्वाराला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहे.
नाशिक : शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. ठक्कर बाजार येथून महिला दुचाकीस्वाराला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठक्कर बाजार बसस्थानकाच्या वाहनतळातून आॅगस्ट महिन्यात फिर्यादी प्रतीक्षा प्रवीणकुमार संचेती (२९, रा.प्रमोद महाजन उद्यानाजवळ) यांची अॅक्टिवा मोपेड दुचाकी (एमएच १५ डीक्यू ०८८७) नजर चुकवून मदतीच्या बहाण्याने लंपास केली होती. याप्रकरणी संचेती यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा दुचाकीचोर येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गुणवंत गायकवाड यांनी आपल्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढत मिळालेल्या माहितीनुसार हवालदार मुकेश राजपुत, सुरेश शेळके , प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, दिलीप गुंजाळ आदींच्या पथकाने सापळा रचून मालेगाव तालुक्यातील देवगट येथून संशयित चोरटा सागर केवल पाटील (३०) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने संचेती यांच्या अॅक्टिवासह होंडा डिलक्स (एमएच १५ सीएच ४६९६), स्पेलेंडर प्लस (एमएच १५ सीवाय ५३४२) आणि गुजरातमधून चोरी केलेली पॅशन प्रो (जीजे ०१ एसक्यू ७८८०) अशा ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.