मालेगाव आगाराचे ७८ दिवसांत ३ कोटी ९० लाखांचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:11 AM2022-01-25T00:11:20+5:302022-01-25T00:11:41+5:30
मालेगाव (अतुल शेवाळे) : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, यासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मालेगाव आगारात गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे आगाराचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
मालेगाव (अतुल शेवाळे) : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, यासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मालेगाव आगारात गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे आगाराचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
तर गेल्या ४ जानेवारीपासून प्रत्येकी पाच वाहक व चालक कामावर हजर झाल्याने नाशिक मालेगाव अशा १०७ फेऱ्या मारून ३ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आगारातील कर्मचाऱ्यांनी गेल्या ७ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्थीनंतर संप पुकारणाऱ्या २२ संघटनांनी संपातून माघार घेतली आहे; मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. मालेगाव आगारात ४०५ कर्मचारी असून अद्यापही ३५९ कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले आहेत. तर ५ चालक व ५ वाहक, कार्यशाळेचे ९ व प्रशासकीय विभागातील २८ असे ४५ कर्मचारी हजर झाले आहेत. १० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर ११८ जणांना कामावर हजर का राहू नये, अशी तंबी देण्यात आली आहे. मालेगाव आगारातून गेल्या ४ जानेवारीपासून १० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. साडेअकरा हजार किलोमीटरच्या १०७ फेऱ्या मारून आगाराने ३ लाख ८५ हजारांचे उत्पन्न मिळविले आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रत्येकी ५ लाख रुपये प्रतिदिन असे ७८ दिवसांचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. या संपाचा तिढा सुटत नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहे.
नाशिकसाठी दररोज पाच फेऱ्या
गेल्या ४ जानेवारीपासून प्रत्येकी ५ चालक व वाहक हजर झाल्याने दररोज नाशिक- मालेगाव अशा पाच फेऱ्या होत आहेत. एका दिवसात शंभर ते दीडशे प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून आगाराला ३ लाख ८५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
मालेगाव आगाराची स्थिती
एकूण बसेस - ७५
सुरू बसेस - ५
संपात सहभागी कर्मचारी - ३५९
कामावर हजर कर्मचारी - ४५
प्रति दिन होणारे नुकसान - ५ लाख
दैनंदिन प्रवासी - सुमारे ३००